पालघर: पालघर नगर परिषदेने माहीम कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर १४५० मिटर लांबीच्या दुभाजक उभारणीसाठी ५८ लाख रुपयांचा खर्च मंजूर केला असून या दुभाजक उभारणीमध्ये तब्बल २८ छेद ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही छेद अवघ्या १००- १५० फुटावर असल्याने दुभाजक उभारण्याचा मूळ हेतू असफल राहिल्याने नगरपरिषदेने केलेला हा खर्च निरुपयोगी ठरणार आहे.
पालघर नगर परिषदेने माहीम रोडवरील आयसीआयसीआय बँक पासून तालुका कृषी केंद्र पर्यंत दुभाजक उभारणीचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. दुभाजक उभारणीच्या प्रक्रियेत छेद ठेवण्याचे ठिकाण वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर विविध गृह संकुलांमधील नागरिकांनी आपल्या इमारतींसमोर छेदन ठिकाणी दुभाजकाची सलगता न राखता आपल्या वाहनांना वळसा न घेता सहजगत हालचाल करता यावी या दृष्टीने ठेकेदाराला दुभाजकांमध्ये छेद ठेवणे भाग पाडले. याविषयी नगरपरिषदेकडे अनेक निवेदन व तक्रारी देण्यात आल्याने दरम्यानच्या काळात दुभाजक उभारणीचे काम काही काळ बंद ठेवण्याचे ठेकेदारांनी पसंद केले होते.
नगरपरिषदेने दुभाजक उभारणीच्या प्रक्रियेत वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या छेद ठेवायच्या ठिकाणांचा विचार केला जाईल अशी भूमिका घेऊन आवश्यकता भासल्यास पोलिसांच्या मदतीने मोकळ्या ठेवलेल्या दुभाजकांमधील जागा भरण्यात येतील अशी भूमिका पालघर नगरपरिषदेने घेतली होती. मात्र नागरिकांकडून तक्रारीचा पाऊस पडत राहिल्याने तसेच पालघरला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगरपरिषद प्रशासनाने ठाम भूमिका घेण्याऐवजी नागरिकांच्या मागणीप्रमाणे दुभाजकांमध्ये ठीकठिकाणी छेद ठेवले.
परिणामी १४५० मीटर अंतरावर तब्बल २८ ठिकाणी छेद असून दुभाजक उभारण्याचा मूळ हेतू फसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अवघ्या १००- १५० फूट अंतरावर दुभाजकामध्ये हे छेद ठेवण्यात आले असून काही ठिकाणी तितकेच अंतर मोकळ्या ठेवण्याच्या घटना दिसून आल्या आहे. याविषयी पालघर नगर परिषदेच्या शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांच्या मागणीवरून तसेच रस्त्याला छेद बिंदू (इंटरसेक्शन) असणाऱ्या ठिकाणी दुभाजकांमध्ये सलगता राखण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दुभाजकांच्या उभारणीमुळे माहीम रस्ता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक व वाहतुकीस त्रासदायक ठरणार आहे.
रस्ता झाला अरुंद
मुळात पालघर माहीम मार्गाच्या दोन्ही मार्गीका प्रत्येकी साडेसहा मीटरच्या रुंद असून सायंकाळी चार वाजल्यापासून या रस्त्यांवर हातगाड्या, भाजी व फळ विक्रेते तसेच खाद्यपदार्थ विक्रेते यापैकी दीड ते दोन मीटर अंतर व्यापत असल्याचे दिसून येते. याशिवाय अनेक ठिकाणी दुचाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग केली जात असल्याने प्रत्यक्षात अवघे चार ते साडेचार मीटर जागा वाहतुकीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे या दीड किलोमीटर अंतरावर रिक्षाला देखील ओव्हरटेक करणे कठीण होत असल्याने या रस्त्यावर नव्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुभाजक उभारणीच बेकायदेशीर?
इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार दुभाजक उभारताना रस्त्याच्या प्रत्येक बाजूची रुंदी किमान सात मीटर असणे व त्या पलीकडे प्रत्येकी तीन मीटर पार्किंगसाठी मोकळी जागा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुभाजक व्यवस्था उभारायला साधारणपणे दीड मीटर असे एकंदर दोन्ही रस्त्यांच्या कडे दरम्यानचे अंतर २१.५० मीटर असणे आवश्यक आहे. या नियमाची पूर्तता होत नसल्याने पालघर नगर परिषदेने उभारलेले दुभाजक बेकायदेशीर असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
प्रकाश योजनेसाठी दुभाजक?
पालघर माहीम रस्त्यांवर काही सामाजिक संस्था व नागरिकांनी वृक्षारोपण केल्याने वाढलेल्या वृक्षांमुळे दिवाबत्ती योजनेतील प्रकाश रस्त्यावर पडत नसल्याने त्यावर तत्कालीन नगर परिषदेच्या सदस्यांनी उपाय म्हणून दुभाजक उभारून त्यामध्ये प्रकाश योजनेचे खांब उभारण्याचे विचाराधीन केले होते. दुभाजक उभारल्यानंतर किती जागा मोकळी राहील तसेच रस्त्याकडेला असणारे अतिक्रमण सातत्याने दूर करण्यासाठी नगर परिषदेकडे क्षमता आहे का याचा विचार न करता निव्वळ खर्च करण्याच्या दृष्टीने हा नागरिकांना गैरसोयीचा ठरणारा उपक्रम राबवल्याची टीका होत आहे.