पालघर : पालघर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याबाबतचा विषय सर्व प्रमुख पक्षांकडून उपस्थित केला जात असताना प्रारूप मतदार यादी मध्ये असणाऱ्या त्रुटींबाबत नागरिकांनी केलेल्या ४६७४ अर्जांपैकी ३५६९ अर्ज (७६.३६ टक्के) स्वीकारण्यात आले असून स्वीकारलेल्या अर्जांमध्ये झालेल्या ७७ (२.१६ टक्के) टंक लेखनाच्या चुका पुरवणी मतदार यादी सुधारण्यात आल्याची माहिती पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी श्याम मधनुरकर यांनी दिली आहे. प्रारूप मतदार यादी बाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांचे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना अनुसारच बदल करण्यात आले असून असे करताना प्रशासन कोणत्याही राजकीय दबावाच्या प्रभावाखाली आले नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.
पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगरपरिषद कार्यालयात तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या निवडणुकीसाठी शहरातील १५ प्रभागा मधून ३० सदस्य व अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ५६ मतदान केंद्र निश्चित केले असल्याची माहिती दिली. पालघर शहरातील मतदार संख्या ५५७२७ इतकी कायम राहणार असून नऊ मतदान केंद्र प्रभाग क्षेत्राच्या बाहेर काही अंतरावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ऑनलाइन भरलेल्या नामनिर्देशन पत्र अर्जांची प्रत नगरपरिषद कार्यालय स्वीकारण्यात येणार असून अर्ज स्वीकारण्याकरिता प्रत्येकी दोन प्रभागांसाठी एक स्वतंत्र टेबल व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दोन टेबल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकी च्या कामात सहभागी होणाऱ्या १२५ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून निवडणूक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी २६ स्वतंत्र टीम (पथक) तयार करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. निवडणुकीतील मतदानाच्या कामासाठी व मतमोजणीसाठी एकंदर ६१ पथकांची आवश्यकता असून त्याकरिता २८० कर्मचारी व अधिकारी यांची आवश्यकता भासणार असून या कर्मचाऱ्यांना १४ व २४ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आवश्यक कागदपत्र, मा हरकत दाखले व इतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी निवडणुकीच्या नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे असेही श्याम मधनुरकर यांनी पत्रकारांना सांगितले.
राजकीय दबाव नाही
प्रारूप मतदार यादी मध्ये असलेल्या त्रुटी बाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १७ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत अर्ज अ व अर्ज ब यांच्यासह आवश्यक पुरावे देण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी तसेच स्थळ पाणी करून निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नगरपरिषदे ने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत स्वतः मतदाराने अर्ज अ द्वारे ४३८३ अर्ज स्वीकारण्यात आले होते व त्यापैकी ३५२१ (८०.३३ टक्के) स्वीकारण्यात आले होते. तर इतरांच्या वतीने अर्ज ब द्वारे दाखल करण्यात २९१ अर्जांप ४८ अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले. स्थळ पाणी अहवाल व अर्जासोबत केलेल्या पुरावाच्या आधारे ८६२ अर्ज अ व २४३ अर्ज ब स्वीकारण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयोगाने १६ जुलै २०२५ रोजी मतदार यादी तयार करण्यासंदर्भात निर्गमित केलेल्या एकत्रित शासन निर्णया च्या आधारे एक गठ्ठा अथवा निवेदन रूपाने देण्यात आलेल्या अर्जांचा विचार करण्यात आला नसल्याची स्पष्टोक्ती श्याम मधनुरकर यांनी केली. विशेष म्हणजे अशा प्रकारची निवेदन प्राप्त झाल्यानंतर अशा निवेदनावर निर्णय घेता येणार नाही याबाबतची सुस्पष्ट कल्पना संबंधित अर्जदारांना देण्यात आल्याची देखील त्यांनी खुलासा केला. मात्र प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादी ७७ तांत्रिक व टंकलेखनाच्या चुका असल्याने त्यांची दुरुस्ती पुरवणी मतदार यादीत करण्यात आली असली तरीही मतदार संख्या कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारूप मतदार यादीत असणाऱ्या चुकांबाबत नगरपरिषदेला स्वयं स्फूर्तींनी (सुमोटो) बदल करण्याचे अधिकार नसल्याने अर्ज नमुन्यात प्राप्त झालेल्या सूचना व आक्षेपांचा विचार करण्यात आल्याचे सांगत या प्रक्रियेत कोणताही दबाव आला नाही असे ते पुढे. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्याकडून प्रभाग बदलण्यासंदर्भात कोणताही अर्ज प्राप्त झाला नसल्याचा देखील खुलासा त्यांनी केला.
