लोकसत्ता वार्ताहर

बोईसर : मुरबे येथील तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी नराधम प्रियकराला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रात्री उशिरा मृत तरुणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पालघर तालुक्यातील मुरबे येथील सुमित तांडेल याने सोमवारी एकलारे गावाजवळ त्याची प्रेयसी स्नेहा चौधरी हीची डोक्यावर दगडाने वार करून त्या नंतर पाण्यात बुडवून निर्घृणपणे हत्या केली होती. हत्या करून फरार झालेला आरोपी सुमित तांडेल याने प्रथम त्याच्या राहत्या घरी आणि त्या नंतर मोरेकुरण पुलाजवळ गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दोन्ही वेळेस त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर सातपाटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बोईसर पोलिसांच्या हवाली केले.

आणखी वाचा-पहिल्या पावसाचे वसईत दोन बळी, समुद्रात बुडून आणि विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

आरोपी सुमित तांडेल याला प्रेयसी स्नेहा चौधरी हिच्या हत्येप्रकरणी कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला पालघर येथील न्यायालयात हजर केले असता १४ जून पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर हे पुढील तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी सुमित तांडेल आणि मयत तरुणी स्नेहा चौधरी यांच्यात चार पाच वर्षांपासून प्रेम संबंध सुरू होते. मात्र स्नेहाच्या कुटुंबीयांचा प्रेमसंबंधास विरोध असल्याने सोमवारी कामावर जाताना दोघांचा रस्त्यात वादविवाद झाला. भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यात दोन तीन वेळा दगडाने वार करून जखमी केलें. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून एकलारे गावामागील खाडी जवळ नेऊन पाण्यात बुडवून स्नेहा हीची निर्घृण हत्या केली.