पालघर: राज्यात सर्वत्र पावसाला धुवाधार सुरुवात झाली आहे. मोसमी पाऊस मुंबई पर्यंत दाखल झाला असून जिल्ह्यात मात्र अद्याप पूर्व मान्सून (वळीवाचा) पाऊस आहे. जिल्ह्यात मे महिन्यात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे करून घ्यावी मात्र पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभाग व हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील काही भागात २३ मे पासून पावसाने जोर धरला असून मे महिन्यात जिल्ह्यात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा तलासरी तालुक्यात सर्वाधिक १४० मिलिमीटर त्या पाठोपाठ वसई तालुका देखील शंभरीच्या जवळ पोहोचला असून ९८.७ मिलिमीटर तर पालघर तालुक्यात ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र मुंबई व राज्यातील इतर भागांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाला आहे. तसेच सर्वत्र मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरीही पालघर जिल्ह्यात मात्र अद्याप मान्सून दाखल झालेला नाही.
६ व ७ मे रोजी जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, तलासरी, वाडा, वसई या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर जवळपास १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर २३ मे पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पुनरागमन केले. तसेच २९ मे ते १ जून दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होईल व हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या सात पट पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील काही भागात अद्याप एक ते दोन मिलिमीटरच पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पुढील काही दिवसात पुन्हा उघडीप पडू शकते. त्यामुळे शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी व १५ जून नंतर पेरणी हंगामाला सुरुवात करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
जून मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस
यंदा महाराष्ट्र सह पालघर जिल्ह्यात देखील सरासरी पेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कमाल तापमान हे सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
१ मे ते २७ मे पर्यंत तालुका निहाय पाऊस मिलिमीटर मध्ये
वसई – ९८.७
वाडा – ५८.८
डहाणू – ६६.६
पालघर – ८०.८
जव्हार – २०.२
मोखाडा – २९.३
तलासरी – १४०.७
विक्रमगड – ५६.५
एकूण – ७४.४
मॉन्सूनच्या पावसाने दक्षिण कोकणसह मुंबई पर्यंत वाटचाल केली आहे. पण पालघर जिल्ह्यात अजून मॉन्सूनचा पाऊस सुरु झालेला नाही. सध्याचा पाऊस हा चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे पडणारा पूर्व मोसमी पाऊसच आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज मिळाल्याशिवाय खरीप पिकाच्या पेरणीची घाई करू नये. तसेच पूर्व लागवडीची कामे पुर्ण करून घ्यावीत. – रिजवाना सय्यद, हवामान तज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र