बोईसर :जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बोईसर ग्रामपंचायत मधील पूर्वेकडील परिसराला मोठ्या प्रमाणात नागरी समस्या भेडसावित आहेत. पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागाचा विकास आणि मूलभूत सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायत विभागाचे दुर्लक्ष होत असून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

बोईसर ही पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत क्षेत्रातील एकूण लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या भारामुळे विकास कामे आणि नागरी समस्या सोडवणे ग्रामपंचायत विभागाच्या आवाक्याबाहेरचे ठरत आहे. बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रातील पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागातील धनानी नगर, यादव नगर, ड्रीमसिटी, वंजारवाडा, दांडीपाडा, थावर पाडा, लोखंडी पाडा या भागात रस्ते, गटार, सांडपाणी निचरा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. पूर्व भागात जवळपास ३० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असल्याचा अंदाज असून यामध्ये परप्रांतीय नागरिकांचा मोठा भरणा आहे.

पूर्व भागात अनधिकृत चाळी आणि इमारत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून बांधकामांसाठी सरकारी मालकीच्या मोकळ्या जागा भूमाफियांकडून हडप करण्यात आल्या आहेत. पूर्व भागातून जाणाऱ्या बोईसर शिगाव रस्त्यासह गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग साचून राहीले आहेत. आठवडाभर कचरा उचलला जात नसल्याने असह्य दुर्गंधीसह रोगराई पसरत आहे. धनानी नगर, यादव नगर परिसरात अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अंतर्गत पक्के रस्ते नसल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. त्याचप्रमाणे घरगुती सांडपाणी वाहून नेणारी गटारे जागोजागी नादुरुस्ती झाल्यामुळे सांडपाणी बाहेर येऊन दुर्गंधी निर्माण होत आहे. बोईसर ग्रामपंचायतीचे पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बोईसर मधील समाजसेवक चंदन सिंह यांनी केला असून समस्यां न सोडवल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

रेल्वे फाटकामुळे विकासाला खीळ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोईसर येथील पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या वंजारवाडा रेल्वे फाटकाच्या जागी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बनविण्याचा प्रश्न गेल्या आठ-दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. या ठिकाणी उड्डाणपूल की भुयारी मार्ग यावर स्थानिक नागरिकांचे मतभेद असल्याने प्रश्न रखडला आहे. वंजारवाडा रेल्वे फाटका मुळे बोईसर पूर्वेच्या भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. औद्योगिक वसाहत, शाळा महाविद्यालये, दवाखाने रुग्णालये, बाजारपेठ सारख्या सेवा सुविधा बहुतांश सर्व बोईसर पश्चिम भागात असून रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीमुळे दिवसभरात वारंवार फाटक बंद करण्यात येत असल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचा खोळंबा होतो. रेल्वे फाटकाच्या अडथळ्यामुळे पूर्व भागात नवीन गृह संकुले बांधण्यास विकासक उत्सुक नसल्याने पूर्व भागाच्या विकासाला खीळ बसली आहे.बोईसर पूर्व परिसरात पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे सुरू असून या भागात बहुतेक जमिनी या सरकारी व वन विभागाच्या असल्याने अनधिकृत बांधकामे, लहान रस्ते व गल्ल्या यामुळे विकास कामे करताना अडथळा येत असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी कमलेश संखे यांनी दिली.