वाडा : “भिवंडी – वाडा” या निकृष्ट महामार्गाने १९ वर्षीय निष्पाप तरुणाचा नाहक बळी घेतला आहे. हि घटना बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या महामार्गाचे अपूर्ण काम असून सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांचे कामाकडे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तरुणाचा नाहक बळी गेला असून अजून प्रशासनाला किती बळी हवे आहेत? तेव्हा हा रस्ता सुस्थितीत केला जाईल अशी भावना व प्रशासनाच्या विरोधात पंचक्रोशीतून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

सदर घडलेल्या अपघाताची वाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. कु.स्मित हेमंत आगिवले (वय १९) असे या बळी गेलेल्या तरूणाचे नाव असुन तो वाडा तालुक्यातील पीक येथील रहिवाशी आहे. तो आई -वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. या घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

स्मित आगिवले हा तरूण वाडा तालुक्यातील वसुरी येथील”ब्लू स्टार कंपनीत दुचाकी घेवून कामाला जात होता. “वाडा- भिवंडी” महामार्गावरील खुपरी गावच्या हद्दीतील प्रशांती हॉटेल जवळ जागोजागी खड्डे पडलेले आहेत. शिवाय हा रस्ता अत्यंत नित्कृष्ट व निसरड्या बनलेल्या रस्त्यावर तरुणाची दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला. याचवेळी दुचाकी पाठीमागून आलेल्या कंटेनर खाली तरुण सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

“भिवंडी -वाडा- मनोर” हा ६४ किमी रस्ता गेल्या १२ वर्षांपासून खड्ड्यात गेला असून मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. गेल्या बारा वर्षात सुमारे ५०० हून अधिक निष्पापांचे बळी या रस्त्यावर गेले आहेत. तर मागील तीन वर्षभरात ९० जणांचे बळी गेले आहेत. हा महामार्ग खड्डेमय स्थितीत आहे, वारंवार वाहने अपघाताचा शिकार होत आहेत. मात्र तरीही शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत.

“वाडा – भिवंडी” रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा कामाचा ठेका हा “ईगल इन्फ्रास्ट्रक्चर”ला देण्यात आला असुन त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराने महामार्गावर जागोजागी खोदकाम केले आहे. सदर खोदकाम करताना कुठलीही काळजी घेतलेली नसून त्याबाबत उपाययोजना देखील केलेल्या नाहीत.

रस्त्याचे काम करताना सुचना फलक, दिशादर्शक फलक, बॅरिगेट्स लावणे अपेक्षित होते मात्र कंत्राटदार यांच्याकडून ते करण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर वारंवार अपघात घडत आहेत. याबाबत अनेकदा “लोकसत्ता”मध्ये बातमी माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र तरीही प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तरूणाचा बळी हा ठेकेदार कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.