बोईसर : तारापूर बोईसर परिसरात रस्त्यांवर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची वाट बिकट झाली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणारा बोईसर चिल्हार राज्यमार्ग आणि बोईसर परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली आहे. बिरसा मुंडा चौक, मुकुट पेट्रोल पंप, टाटा हाउसिंग, वाघोबा खिंड, नागझरी नाका, वेळगाव, खुटल, मधुर चौक, टाकी नाका, कमलिन नाका, टाटा स्टील रोड या प्रमुख ठिकाणी पडलेल्या मोठ्या आकारांच्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी सोबतच किरकोळ अपघात होत आहेत. एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ते आणि दुरुस्तीच्या कामांसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च होऊन देखील कामांतील निकृष्ठ दर्जामुळे दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी खड्ड्यांची समस्या यावर्षी देखील कायम आहे.

बोईसर चिल्हार राज्यमार्गाची वाट बिकट

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ते तारापूर औद्योगिक क्षेत्र व बोईसर शहराला जोडणाऱ्या १६ किमी लांबीच्या बोईसर ते चिल्हार या राज्यमार्गाची वाट बिकट बनली आहे. दिवसभरात या राज्यमार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ सुरु असते. रोज ५० ते ६० हजार मालवाहू अवजड आणि खाजगी हलक्या वाहनांची वाहतूक होणाऱ्या या मार्गाचे तीन वर्षांपूर्वी १०० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून एमआयडीसीमार्फत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र बिटकॉंन या ठेकेदार कंपनीने निकृष्ठ दर्जाचे काम केल्यामुळे अवघ्या तीन वर्षातच जागोजागी रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ता वाहतुकीकरीता धोकादायक बनला आहे. या वर्षीच्या पावसात बिरसा मुंडा चौक, मुकुट पेट्रोल पंप, टाटा हाउसिंग, वाघोबा खिंड, नागझरी नाका, वेळगाव, खुटल, चिल्हार फाटा या ठिकाणी रस्त्याची चाळण होऊन मोठ्या आकारांचे खड्डे पडल्याने वाहतूकीचा वेग मंदावला आहे.

नवापूर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

बोईसर नवापूर रस्त्यावरील मधुर चौक, टाकी नाका आणि कॅम्लिन नाका या ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रसत्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम पावसामुळे बंद असून प्रमुख चौकांमध्ये खड्डे पडल्याने सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस नागरीकाना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागत आहे.

एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

तारापूर एमआयडीसीला जोडणारे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, पदपथ आणि दुभाजाकांसाठी एमआयडीसीमार्फत तब्बल २२४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तीन वर्षात सर्व कामे पूर्ण करण्याची मुदत असली तरी ठेकेदाराने अंतर्गत रस्ते ठीकठिकाणी खोदून ठेवल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा बंद होऊन रस्ते उखडून चाळण झाली आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याकडून आंदोलन

तारापूर बोईसर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांच्याकडून रस्त्यावर झोपून,खड्ड्यातील पाण्यात आंघोळ तसेच स्वखर्चाने खड्ड्यांची भरणी, भिक मांगो आंदोलन करीत एमआयडीसीचा निषेध करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यास अडचण येते.मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बोईसर चिल्हार रस्ता तसेच एमआयडीसीच्या अंतर्गत भागातील मोठे खड्डे बुजविण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर बंद असलेले कॉंक्रीटीकरणाचे काम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. – अविनाश संखे, उपअभियंता, तारापूर एमआयडीसी