पालघर : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर खानिवडे टोल नाक्यावर सातत्याने निर्माण होणारी अति तीव्र वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा याविरोधात बोईसरचे आमदार विलास तरे यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. टोल नाक्यांवर ५०० मीटर पेक्षा अधिक रांगा लागल्यास टोल वसूल न करण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी भूमिका घेत आमदार विलास तरे यांनी टोल नाक्यावरील वाहनांच्या लागलेल्या रांगा मोकळ्या करून देण्यास आक्रमक भूमिका घेतली.
खानिवडे टोल नाक्यावर दररोज एक ते दोन तास वाहनांच्या रांगा लागतात, परिणामी नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला यांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. या गैरव्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेत आमदार तरे तब्बल दोन तास खुद्द टोल नाक्यावर थांबून वाहतूक सुरळीत केली. “मी लोकप्रतिनिधी असून जनतेच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत, मी ते माझ्या कर्तव्याचा भाग समजतो,” असे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
रस्त्यांची अवस्था झाल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाल्याचे आमदार तरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. “पालघर जिल्ह्यातील ससूपाडा (ता. वसई) ते आच्छाड (ता. तलासरी) दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी पडलेले मोठमोठाले खड्डे हे अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले आहेत. या रस्त्यांमुळे गेल्या एका वर्षात किमान १७९ निरपराध लोकांनी अपघातात आपला जीव गमावला आहे. हे बळी अपघाताचे नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि टोल वसूल करून देखभाल न करणाऱ्या यंत्रणेचे आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
“टोल घेताय, पण सुविधा कुठे?” भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार टोल नाक्यावर वाहन जास्तीत जास्त १० मिनिटांपेक्षा अधिक थांबता कामा नये. त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास टोल शुल्क माफ करावे, हा नियम आहे. मात्र प्रत्यक्षात वाहनचालकांना एक-एक, दोन-दोन तास रांगेत उभे रहावे लागते, आणि त्याच वेळी त्यांच्याकडून बिनधास्त टोल वसूल केला जातो. हे सरळसरळ अन्यायकारक आणि फसवणुकीचे उदाहरण असल्याचे आमदार तरे यांनी ठणकावून सांगितले.
टोल बंद करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू “जर टोल घेत असाल, तर सुविधा देखील द्या. अन्यथा हा टोल वसूल करण्याचा तुम्हाला कोणताही नैतिक अधिकार नाही. रस्त्यांवर खड्डे, टोल नाक्यावर कोंडी, अपुऱ्या सुविधा आणि नागरिकांची रोजची फरपट हे सगळं असह्य झालं आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा थेट इशाराही आमदार तरे यांनी दिला.
जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका – व्यवस्था सुधारा! हे संपूर्ण प्रकरण फक्त रस्त्यांची दुरवस्था किंवा टोल कोंडीपुरते मर्यादित नाही, तर हे शासन, प्रशासन व खासगी टोल व्यवस्थापन कंपन्यांच्या निष्काळजीपणाचे मूर्त उदाहरण आहे. “आम्ही विकासाला विरोध करत नाही, पण विकासाच्या नावाखाली फक्त लुट चालू आहे, आणि त्याचा बळी सामान्य माणूस ठरत आहे,” असेही आमदार तरे यांनी ठणकावून सांगितले. या प्रसंगी शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.