बोईसर : आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून आपल्या साथीदारांसह घरात धाड टाकत एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्याला अटक करण्यात बोईसर पोलिसांना यश आले. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून काही फरार आरोपींचा पोलिसांमार्फत शोध सुरू आहे.

बोईसर जवळील मान येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात लाखो रुपयांची रोख रक्कम असल्याची माहिती आरोपीला त्याच्या साथीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार प्रमुख आरोपी फैयाज काझी उर्फ मनीष पावसकर व त्याच्या साथीदारांनी घरामध्ये महिलेचा पती नसल्याची संधी साधत पत्नी व मुले यांना आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली, तुमच्या घरात गैरमार्गाने मिळवलेली मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड असल्याची भीती दाखवली तसेच आयकर विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवून महिलेचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. आरोपींनी आयकर विभागाची धाड पडल्याचे सांगत फिर्यादीच्या घरातील कपाटात असलेले ५५ लाख ८० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

या प्रकरणी महिलेने बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी तपासा बाबत मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव राठोड, उपनिरीक्षक चंद्रकांत हाके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून बोईसर चिल्हार रस्ता, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, मनोरवाडा भिवंडी महामार्ग परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तोतया आयकर अधिकारी फय्याज कादर काझी उर्फ मनीष पावसकर हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे राहणारा असून पोलिसांनी या प्रमुख आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपीकडून २३ लाख ७० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपीचे इतर साथीदार हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.