कासा : डहाणू तालुक्यातील कासा -वरोती- वांगर्जे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी तीन महिन्यांपूर्वी खडी आणून टाकली परंतु अद्यापही काम मात्र सुरू झाले नाही. त्यामुळे नागरिकांना तीन किमी रस्त्याऐवजी तवा किंवा मुरबाड वेती मार्गे आठ ते दहा किलोमीटरची अंतर गाठून कासा येथे यावे लागते.
वांगर्जे पाटिलपाडा आणि चरीपाडा मार्गे हा रस्ता पिंपळशेत बु. ला जातो, या भागात साधारणपणे पाच ते सहा हजार लोकसंख्या आहे. तरी सदर गावकऱ्यांना कासा, डहाणू किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जायचे असेल तर याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. सदर रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
रस्त्यावरील पुलाचे कठडे तुटलेले आहेत तर काही भागात पूर्ण रस्ता वाहून गेलेला आहे .
तसेच रस्ता अतिशय अरुंद असल्याकारणाने समोरासमोर दोन चारचाकी वाहने आल्यास अडचण निर्माण होते. पिंपळशेत गावातून कासा येथे येण्यासाठी वांगर्जे वरोती असा रस्ता आहे. परंतु या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. दुचाकी चालवतानासुद्धा नागरिकांना कसरत करावी लागत आहे . अवघ्या चार ते पाच किमी रस्त्याच्या प्रवासासाठी अर्धा तास वेळ लागत आहे. त्यामुळे आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्री यांना दवाखान्यात नेतानासुद्धा मोठय़ा प्रमाणात गैरसोय होते.
रस्ता खराब असल्याने वाहनांचे टायर फुटणे, वाहन घसरणे असे प्रकार होत असल्याने वाहन मिळणेही कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सदर रस्त्याबाबत तक्रारी केल्या परंतु रस्त्याच्या कामाची काहीही सुधारणा झालेली नाही . तरी लवकर रस्त्याचे काम करून नागरिकांना होणारा मनस्ताप दूर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले.