पालघर : पालघर शहराच्या बाजूने वाहणाऱ्या पाणेरी ओहोळातील प्रदूषण पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले असताना या ओहोळातील पाणी तांबूस झाल्याचा प्रकार मंगळवार दुपारी उघडकीस आला. या संदर्भात माहीम ग्रामपंचायत तक्रार नोंदवल्यानंतर दोषी कंपन्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धावपळ सुरू झाली आहे.
केळवे रोड परिसरातून उगम होणाऱ्या या पाणेरी ओहोळामध्ये पालघर नगरपरिषद क्षेत्रामधून निघणारे घरगुती सांडपाणी पसरत असून त्याचबरोबरीने माहीम चिंतूपाडा येथील पीडको औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांचे देखील रासायनिक सांडपाणी सोडण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेकदा अपयश आल्याने पाणेरी ओहोळ प्रदूषित होत असल्याने माहीम ग्रामस्थांनी अनेकदा याविषयी आवाज उठून आंदोलन केली होती. या संदर्भात माहीम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जनता दरबार मध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी औद्योगिक आस्थापनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्याच्या दृष्टीने दोशी कंपन्यांवर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली होती.
मंगळवारी सकाळी या औद्योगिक वसाहती मधून सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे पाणेरी ओहोळातील पाणी तांबूस रंगाचे झाल्याचे दिसून आले. याची दखल घेऊन माहीम ग्रामपंचायती तर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोईसर येथील कार्यालयात तक्रार नोंदवल्यानंतर दोषी कंपन्यांचा शोध घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पालघर परिसरातील उद्योगांमध्ये तपासणी करत असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये पाणेरी ओहोळात अशाच प्रकारे रसायन मिश्रित पाणी सोडले गेल्याने पूर्ण ओहोळातील पाण्याचा रंग पिवळा झाला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मनुष्यबळाची मर्यादा असल्याने पालघर मधील उद्योगांवर देखरेख ठेवण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक कार्यालय अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ओहोळातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले. काही पावडर ग्राइंडिंग करणाऱ्या कंपन्यांचा या प्रकरणात संशय घेण्यात येत असून रासायनिक उत्पादने करणाऱ्या कंपन्यांचा शोध घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.
रासायनिक सांडपाणी का सोडले जाते ?
पालघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत रसायन अथवा रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यास पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासोबत अशा रासायनिक पाण्याचे सोम्यीकरण (डायलूशन) होऊन असे पाणी एकत्रित खाडीमार्गे समुद्रात जाऊन मिसळते. मुसळधार पावसाच्या वेळी पाणेरी ओहोळातील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने ही बाब सहजासहजी कोणाच्या निदर्शनात येत नसल्याने असे गैरकृत्य करण्यास काही उद्योगांचा हातखंड झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पालघर तालुक्यात पावसाने उघडीप घेतल्याने पाणेरी ओहोळातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने या ओहोळातील पाण्याचा रंग बदलण्याचे प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास आल्याचे दिसून आले आहे.