अहवाल विलंबामुळे संसर्गाचा फैलाव; जिल्ह्य़ातील रुग्ण संख्येत वाढ

पालघर: एकीकडे पालघर जिल्ह्यात व विशेषत: वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत असताना नागरिकांमध्ये करोना तपासणी संदर्भात निरुत्साह दिसून येत आहे. तर दुसरीकडे शासकीय तपासणी अहवालाला लागणारा विलंब  संसर्गाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरत आहे. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात ६९३ नागरिकांना करोना लागण झाली असून २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डिसेंबर महिन्यात १७३ तर महानगरपालिका क्षेत्रात ५२० रुग्ण वाढ झाली असून महानगरपालिका क्षेत्रात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर झपाटय़ाने वाढला असून महानगरपालिका क्षेत्रात दररोज ८० ते १०० नवीन रुग्ण आढळून येत आहेत तर ग्रामीण भागात सध्या दररोज दहा ते पंधरा रुग्ण वाढ होताना दिसून येत आहे. करोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना सौम्य लक्षण दिसून येत असून सर्दी-खोकला व कमी तीव्रतेचा ताप ही  प्रामुख्याने  लक्षणे आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शालेय विद्याार्थ्यांना वातावरण बदलामुळे सर्दी-तापाने ग्रासले असून त्यापैकी काहींना करोना संसर्ग झाल्याचे निसपन्न झाले आहे. नाताळ सणा निमित्ताने तसेच लग्न समारंभादरम्यान मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली असून त्यामुळे आजाराच्या प्रसाराला चालना मिळाली. असे असले तरी ही आजाराची लक्षणे असणाऱ्या नागरिकांकडून करोना तपासणी करण्यात निरुत्साह दाखवला जात असल्याने बाधित व्यक्ती दक्षता घेत नसलायने करोण फैलाव झपाटय़ाने होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

व्यापक प्रमाणात तपासणी करण्याचे संकेत

जिल्ह्यातील करोना रुग्ण वाढीचा दर लक्षात घेता नवीन वर्षांमध्ये तपासणीचे प्रमाण वाढवण्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच विविध प्रकारच्या विक्रेत्यांमध्ये आजाराची लक्षणे असणाऱ्याची तपासणी करण्याचे योजना तयार करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास करोना चाचणी तातडीने करावी असे आवाहन केले आहे.

दुसऱ्या लाटेची पुनरावृत्ती

करोना संदर्भात शासकीय यंत्रणेत तपासणी केल्यास त्याचे अहवाल प्राप्त होण्यास दोन ते पाच दिवसांचा अवधी लागत आहे. दरम्यानच्या काळात लक्षणे असणाऱ्या नागरिकांकडून विलगीकरण केले जात नसल्याने संसर्गाचा  झपाटय़ाने प्रसार होऊ लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून करोना संसर्ग प्रतिबंध संकेतांचे उल्लंघन होत असल्याने दुसऱ्या लाटेप्रमाणे आजाराचा फैलाव झपाटय़ाने होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

तपासणीसाठी यंत्रणा सज्ज

करोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांचे प्रतिजन चाचणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुबलक प्रमाणात किट उपलब्ध असून ही तपासणी जवळपास सर्व आरोग्य केंद्रात करण्याची सुविधा आहे. जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणीचे नमुने मुंबई येथील दोन शासकीय प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात येत असून त्या ठिकाणाहून अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत आहेत.  शहरी भागात सुविधा असली तरी नमूद  दारांपेक्षा अधिक दर आकारणी होत आहे. शासकीय व्यवस्थेमधून सध्या दररोज शंभर ते सव्वाशे  नमुने पाठवण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये विक्रमगड, वाडा, पालघर व बोईसर येथील नमुन्यांचा समावेश आहे.  अहवाल उपलब्ध होण्यास विलंब होत असल्यामुळे आजाराचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहे.