पालघर :जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना वाव मिळावा तसेच या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमवावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रतिपादन केले. जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, आदिवासी भागातील खेळाडूंसाठी आश्रम शाळेत विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था व्हावी तसेच खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे या दृष्टीने वेगवेगळ्या योजना तयार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व जिल्हा क्रीडा परिषद यांच्याद्वारे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २५ एप्रिल ते १० मे दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराला भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक पणे चर्चा केली.

दोन सत्रामध्ये पालघर येथील आगरी पाडा मैदान व डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेच्या पटांगणावर आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिरामध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, पावरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, बेसबॉल, खो खो, बॅडमिंटन, वॉलीबॉल, शूटिंग व आर्चरी अशा ११ खेळांचा समावेश करण्यात आला असून तज्ञामार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे.

क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे व सरावाची गरज काय असा सवाल जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थींना विचारून लठ्ठपणा व त्या संबंधित आजार दूर ठेवण्यासाठी क्रीडा प्रकार खेळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. खेळ खेळल्यामुळे शरीराच्या तंदुरुस्ती सोबत शरीरातील ऊर्जा पातळी वाढून वयस्कर होईपर्यंत शरीरातील हालचाली चांगल्या राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळ खेळल्यामुळे तंदुरुस्ती सोबत बुद्धिमत्तेत वाढ, मानसिक स्वास्थ सुदृढ राहणे, एकाग्रता वाढणे तसेच संघ भावना व नेतृत्व गुण विकसित होण्यात मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी नवीन क्रीडा प्रकार बघून अभ्यासावा असेही सल्ला त्यांनी दिला.

पालघर येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, जिल्हा क्रीडा संकुलाचा दैनंदिन व देखभाल दुरुस्तीचा खर्चाची तरतूद करण्यासाठी काही भागाचा वाणिज्य वापर करण्यावर योजना बनवणे यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळा स्तरावर प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांची नेमणूक करणे व जिल्हास्तरावरून प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी योजना तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी उद्योगांकडून सहकार्य मिळण्यासाठी प्रयत्नशील राहून असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सुमारे ७० हजार विद्यार्थी सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळातील प्राथमिक ज्ञान व कौशल्य होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व एम स्पोर्ट्स फाऊडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका निहाय आदिवासी शाळांतील १० ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा कौशल्य शोध स्पोर्ट्स टॅलेंट हंट उपक्रम राबविण्यात आला आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अजित कुलकर्णी व त्यांच्या सहाय्यक संघ यांच्या माध्यमातून मोखाडा, विक्रमगड, जव्हार, वाडा, तलासरी, पालघर, वसई येथील २०० आदिवासी शाळांमधील सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.