विक्रमगडमध्ये वीजबिलांचा घोळ

विक्रमगड तालुक्यात अनेक नागरिकांना महावितरण कंपनीतर्फे प्रत्यक्षात मीटर रिडींग न घेता सरासरी बिले दिली जात असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरासरी बिले पाठवल्याने रकमांमध्ये वाढ; ग्राहकांना भुर्दंड

पालघर : विक्रमगड तालुक्यात अनेक नागरिकांना महावितरण कंपनीतर्फे प्रत्यक्षात मीटर रिडींग न घेता सरासरी बिले दिली जात असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या वीज बिलांची छपाई सदोष असल्याचे दिसून आले असून बिलांच्या गोंधळामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे.

विक्रमगड परिसरात १३ हजार २९६ वीज ग्राहक असून त्यांच्याकडे सद्यस्थितीत साडेसहा कोटी रुपयांची थकबाकी रक्कम आहे. विक्रमगड भागात अनेक ग्राहकांना प्रत्यक्षात वीजबिलाकरिता रिडींग न घेता सात ते आठ महिन्यांपासून सरासरी बिल आकारणी केली जात आहे. अशा सरासरी बिलांवर मीटरचे छायाचित्र छापले जात नसून त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. पाच-सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अचानकपणे वीज रिडींग घेतल्याने ग्राहकांना मोठय़ा रकमेचे देयक निघत असल्याने ग्राहकांसमोर त्या रकमेचा भरणा करण्यास अडचण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अनेक बिलांचा मागचा भाग कोरा राहात असल्याने आकारणीबाबतचा इतर तपशील उपलब्ध होत नाही.

यासंदर्भात महावितरण कंपनीशी संपर्क साधला असता विक्रमगड परिसरातील ५२९ ग्राहकांना सरासरी वीज बिले येत असून ज्या एजन्सीला मीटर रिडींग घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे.

सरासरी बिलाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महावितरण कर्मचारी तातडीने त्यांना विद्यमान सुरु असलेल्या मीटर रीडिंगच्या आधारे दुरुस्त केलेली देयके तात्काळ देत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. तसेच बिलाच्या मागच्या बाजूच्या छपाई संदर्भात तांत्रिक दोष असल्यास संबंधित एजन्सीला कळवण्यात येईल, असे महावितरणच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Confusion electricity bills vikramgad ysh

Next Story
नैसर्गिक नाला बुजविल्याने गालतरे रस्त्याला धोका