लसपुरवठय़ासाठी नगरसेवक आक्रमक

पालघर : पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी नगर परिषद क्षेत्रातील लसीकरण केंद्रांना लशी मिळाव्यात यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर गोंधळ घातला. लशींच्या पुरवठय़ासाठी यावेळी नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसले.

पालघर ग्रामीण जिल्ह्याला गेल्या काही महिन्यांपासून सर्वात कमी लसपुरवठा होत आहे. जिल्ह्यात झालेल्या लसीकरणात पालघर नगर परिषद क्षेत्रात आतापर्यंत सुमारे दीड लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नगर परिषद क्षेत्रात अजूनही हजारो नागरिकांनी लस घेतलेली नाही. त्यांना लस मिळाव्यात यासाठी नगर परिषदेत किमान दोन केंद्रांना लस उपलब्ध करून देण्याची यावेळी मागणी करण्यात आली नगर परिषद क्षेत्रात एकच लसीकरण केंद्र सुरू आहे,  या केंद्रावर रात्रभर रांगेत उभे राहून लसीकरण करून घ्यावे लागत आहे. लस मिळत नसल्याने नगरसेवक यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी एकत्रित येत लशींची मागणी केली आहे. पालघर नगर परिषद कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्र सुरू करूनही लस दिलीच जात नाही, असे आरोप या नगरसेवकांनी यावेळी केले. नगरसेवकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांची भेट घेऊन आम्हाला लशीचा पुरवठा का केला जात नाही, म्हणून जाब विचारला आणि लशीचे वाटप नसल्याने पालघर नगर परिषद कार्यक्षेत्रात लसीकरण बंद आहे, असे निदर्शनास आणून दिले.

केंद्राबाहेर लसीकरण

पालघर शहरात भगिनी समाज शाळेच्या आवारात अधिकृत लसीकरणाचे केंद्र सुरू असताना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात लसीकरण सुरू असल्याचे पालघरच्या नगरसेवकांनी शोधून काढले. केंद्रावर ४६ जणांना दिवसभरात लस दिल्याचे नोंद आहे. ते कर्मचारी आरोग्य विभागाशी संबंधित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. यापैकी काही बँक व्यवस्थापक, खासगी व्यावसायिक व प्रतिष्ठित कंपनीतील कर्मचारी आहेत. या लशीसाठी किंमत आकारली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. परवानगी नसताना तसेच शहरात लशींचा तुटवडा असताना असे अनधिकृत लसीकरण केंद्र कसे चालवले जाते, असा प्रश्न नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांनी उपस्थित केला आहे. संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी केली आहे.

नगर परिषदेच्या शिक्क्य़ांचा गैरवापर

केंद्रावर लसीकरण सुरू झाले की, त्यावेळी नगर परिषदेच्या काही नगरसेवकांकडून  नगर परिषदेच्या शिक्क्य़ांचा गैरवापर केला जातो. या शिक्क्य़ांचा वापर करून लसीकरणासाठी ओळखपत्रे त्यांच्याकडून तयार करून आणि ती हितचिंतकांना दिली जातात, असा आरोप माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केला आहे. लशींसाठी लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून ती उपलब्ध करून घेणे, असे ते म्हणाले.

शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लशींच्या वाटपाचे योग्य ते नियोजन केले जाते. जिल्हा मोठा व केंद्र जास्त असल्याने अशा अडचणी निर्माण होत आहेत.

-डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. पालघर