पालघर: पालघर शहराला सध्या गढूळ आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. एकीकडे पालघर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे वेवूर, घोलविरा, वीरेंद्रनगर, डूंगीपाडा, पवारपाडा आणि धापशीपाडा परिसरातील नागरिकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे नदीतून मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित पाणी येत आहे. या पाण्यावर जलशुद्धीकरण प्रक्रिया करून शहरात पाणीपुरवठा केला जात असला तरी नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसांत पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
वेवूर, घोलविरा, वीरेंद्रनगर, डूंगीपाडा, पवारपाडा, धापशीपाडा आणि पूर्व विभागातील नळांना दूषित व गढूळ पाणी येत आहे. यामुळे लहान मुले आणि वृद्ध नागरिक कावीळ, ताप, उलटी, जुलाब यांसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडत असल्याचा गंभीर आरोप स्वराज्य फाउंडेशन, पालघरने मुख्याधिकाऱ्यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात केला आहे. दूषित पाण्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही फाउंडेशनने दिला आहे.
एकूणच पालघरमधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनीही आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.