पालघर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या या आंदोलनाचा एक भाग म्हणून, कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना पाठवले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या निवेदनात विशेषतः १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत कायमस्वरूपी समायोजन करण्याची मुख्य मागणी केली आहे. यासह जिल्हा परिषदेसमोरील या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी एकूण २० प्रमुख मागण्या मांडल्या. या मागण्यांमध्ये १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे, १५ टक्के मानधनवाढ आणि लॉयल्टी बोनस लागू करणे, तसेच ग्रॅच्युटी आणि ईपीएफ योजना लागू करण्याची मागणी समाविष्ट आहे.

याव्यतिरिक्त अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद, गटविमा योजना लागू करणे, आणि वेतनसुसूत्रीकरण करून जुन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन ४०,००० रुपये एकत्रित करण्याची आणि त्यांच्यासाठी बदली धोरण लागू करण्याची मागणीही जोर धरत आहे.

तात्काळ बैठकीची मागणी

आंदोलकांनी आपल्या निवेदनात, रिक्त जागांची माहिती जाहीर करून पदभरतीपूर्वी एनएचएम कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची मागणी केली आहे. तसेच मानधन वाढीसाठी मूल्यांकन अहवाल पद्धत बंद करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी सरसकट वाढ लागू करण्याची विनंती केली आहे. या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी, संघटनेने आरोग्यमंत्र्यांनी एका आठवड्यात बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.