बांधकाम परवानगीसाठी दलालांचा सुळसुळाट

पालघर नगर परिषद कार्यालयात नव्याने बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र   घेण्यासाठी मूळ अर्जदाराऐवजी दलालांचा सुळसुळाट सुरू आहे.

पालघर नगर परिषदेत बांधकाम परवानग्यांत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

पालघर : पालघर नगर परिषद कार्यालयात नव्याने बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी मूळ अर्जदाराऐवजी दलालांचा सुळसुळाट सुरू आहे. यामध्ये काही वास्तुविशारदांचाही समावेश असल्याचेही सांगितले जाते. आर्थिक गैरव्यवहार करून बांधकाम परवानगी दिल्या जात असल्याचा आरोप नगरसेवक करीत आहेत.

पालघर नगर परिषद हद्दीमध्ये नव्याने इमारत बांधकाम परवानगीच्या काही प्रकरणांमध्ये अर्जदार स्वत: अर्ज करत असले तरी बांधकाम परवानगी घेताना अर्जदारऐवजी त्याचे मध्यस्थी असलेले दलालवर्ग बांधकाम परवानगीसाठी नगर परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडे तगादा लावताना दिसत आहेत. बांधकाम आराखडा किंवा तांत्रिक बाबी तपासण्यासाठी वास्तुविशारदाकडून त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी देताना आर्थिक गैरव्यवहार व लाचखोरी मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत

बांधकाम परवानगी देताना अनेक वेळा नगर परिषद प्रशासन विविध बाबींचा अभ्यास न करता, प्रत्यक्ष पाहणी न करता थेट बांधकाम परवानगी देत आहे. अनेक ठिकाणी बांधकाम परवानगी देताना अग्निशमन नियमावलीला बगल देऊन परवानगी दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नगर परिषद क्षेत्रामध्ये विकासकांना परवानग्या देताना नैसर्गिक नाले तसेच चतु:सीमा या ठिकाणी असलेल्या वस्ती वाडी यांचाही विचार केला जात नाही. आजूबाजूच्या परिसरात असलेले आदिवासी पाडे वस्ती दाखवणे अपेक्षित असताना ते न दाखवता अभियंता व काही दलाल हातमिळवणी करून कायद्याला बगल देत परवानगी काढली जात आहे.

प्रभाग क्रमांक चारमध्ये अशा अनेक तक्रारी आजही मुख्याधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी दाखल आहेत. मात्र बराच कालावधी गेल्यानंतरही यावर निर्णय का दिला जात नाही हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले जाते. बांधकाम परवानगी घेताना त्यामध्ये पूर्तता करावयाच्या अनेक अटी-शर्तीना बगल देऊन बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्याचे आरोप नगरसेवक करीत आहेत. दलाल यांच्याऐवजी स्वत: अर्जदार यांनाच कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगावे व त्यांनाच बांधकाम परवानग्या प्रत्यक्षात द्याव्यात, अशी मागणीही या निमित्ताने केली जात आहे.

बांधकाम परवानगी घेण्यासाठी अर्जदाराएवजी वास्तुविशारद किंवा दलाल यांचा सुळसुळाट आहे. नगर परिषद प्रशासनातील काही अधिकारीवर्ग गैरव्यवहार व हितसंबंध जोपासून चुकीची कृत्य करीत आहेत. अभियंतावर्गाने प्रत्यक्ष पाहणी करून परवानगी देणे आवश्यक असताना तसे झालेले नाही.

प्रवीण मधुकर मोरे, नगरसेवक, प्रभाग क्र.४, नगर परिषद,  पालघर

प्रत्यक्षात अर्जदारानेच बांधकाम परवानगीबाबतीत कामे करणे अपेक्षित आहे. गैरप्रकार होत असतील तर त्यावर चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

-भावानंद संखे, गटनेता, नगरपरिषद पालघर

सहायक नगररचनाकार यांच्याकडून याबाबतची माहिती घेऊन त्यानंतरच यावर सांगणे किंवा बोलणे उचित राहील.

स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, नगरपरिषद पालघर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Convenience brokers building permission ysh

ताज्या बातम्या