त्रुटी दुरुस्त करण्याचे काम हाती

पालघर : जिल्हा आरोग्य विभागाकडून दररोज प्रसारित होणाऱ्या करोनाच्या दैनंदिन अहवालामध्ये त्रुटी असल्याचे ‘लोकसत्ता’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने हा अहवाल प्रसिद्ध करण्याचे बंद केले आहे. राज्य आणि जिल्ह्य़ाच्या आकडेवारीत आलेली तफावत दूर केल्यानंतर अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्रकाशित होणाऱ्या दैनंदिन करोना अहवालात वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या सलग अकरा दिवस ७३ इतकीच दाखवण्यात आली होती. त्याचबरोबरीने या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे ‘लोकसत्ता’मध्ये १५ जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर १६ जुलै रोजी जिल्हा प्रशासनातर्फे सुधारित अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करोना अहवाल पाठविण्याचे बंद केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून संगण्यात आले.

जिल्ह्य़ातील पत्रकारांच्या ‘व्हॉट्सअप ग्रुप’वर जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्य पातळीवर प्रसिद्ध होणारा करोना अहवाल रात्री उशिरा देण्यात येत असला तरी पत्रकारांना वृत्त संकलनासाठी आवश्यक तालुकानिहाय तसेच विविध क्षेत्रनिहाय रुग्णवाढ व तपशीलवार माहिती प्राप्त होण्याचे बंद झाले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने अहवालातील त्रुटी दूर करून अद्ययावत पद्धतीने अहवाल प्रसिद्ध करून लोकांपर्यंत करोनाची माहिती प्रसिद्ध करण्याऐवजी नकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल नागरिकांमध्ये तसेच पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता राज्याकडून  तसेच जिल्ह्य़ाच्या अहवालातील आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे दिसून आल्याने ती दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर पत्रकारांना नियमित अहवाल दिला जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले.

डॅशबोर्डवरील खर्च वाया

जिल्हा प्रशासनाने करोना संक्रमणाची माहिती तसेच विविध रुग्णालयांत उपलब्ध खाटांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहजगत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरीय करोना डॅशबोर्ड तयार करण्यात आला होता. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी अद्ययावत अपडेट करोना माहिती या डॅशबोर्डवर उपलब्ध होऊ शकली नसल्याने तसेच या डॅशबोर्डची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नसल्याने या कामावर जिल्हा प्रशासनाने केलेला खर्च वाया गेल्याचे दिसून आले आहे.

करोना रुग्णांच्या नोंदीबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली.