कासा: वातावरणातील वाढलेले तापमान तसेच मानवनिर्मित कारणांमुळे गेल्या आठवडय़ापासून पालघर जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मोठय़ा प्रमाणात वणवे लागले असून त्यामुळे वनसंपत्तीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक जंगलातील आगी मानवनिर्मित असून अजूनपर्यंत कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही.
उन्हाळा सुरू झाला की जंगलामध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. गेल्या काही दिवसांपासून कासा, पालघर व वाडा वनपरिक्षेत्रामध्ये असलेल्या जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत.जंगलामध्ये आग लागल्याने जंगलातील सूक्ष्म जीव, पशु-पक्षी, त्यांची घरटी व अंडी, सरपटणारे प्राणी यांची मोठय़ा प्रमाणात जीवितहानी होते तसेच जंगलातील लहान मोठय़ा वनस्पती जळून खाक होत आहेत. मागील शनिवारी मेंढवन खिडीजवळील डोंगरामध्ये आग लागून जवळपास सात हेक्टरवरील वनसंपत्ती आणि जैवविविधता जळून खाक झाली आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आग विझवण्यासाठी पुरेशी साधन सामग्री नसल्याचे दिसून आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी कासा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे चार ब्लोवर आहेत. परंतु गेल्यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या ब्लोवर चा स्फोट होऊन दोन वनरक्षक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे हे ब्लोवर वापरण्याचे टाळण्याच्या सूचना आहेत. कासा वनपरिक्षेत्रामध्ये असलेल्या उंच डोंगरांमध्ये आग लागल्यानंतर कडे- कपारी असल्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासाठी वेळेत पोहचता येत नाही. त्यामुळे आग फोफावत जाते आणि आग विझवणे नियंत्रणाबाहेर जाते. तरी जंगलामध्ये लागणारी आग रोखण्यासाठी ज्या व्यक्तीकडून मुद्दाम आग लावली जाते, त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरजेची आहे. वनांमध्ये आग लागण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत असल्या तरी अद्याप एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. लागलेली आग वेळीच विझवता यावी यासाठी वनांमध्ये आग विझवणारी यंत्रणा उभी करण्याची मागणी वन्यजीवप्रेमी करत आहेत.
दरम्यान जंगलामध्ये आग लागून नव्याने लावलेले रोप जळू नयेत यासाठी नव्याने लावलेल्या रोपांच्या जवळ खाचर खोदून फायर लाईन तयार केली जाते. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही. सुकलेला पाला-पाचोळा वाऱ्यामुळे या खाचरामध्ये भरला जाऊन आग नव्याने लावलेल्या रोपापर्यंत पोहचते आणि रोपे जळून जातात, असे सांगितले जाते.
शिकारीसाठी आगी
कासा वनपरिक्षेत्रामध्ये पोळा, सोमटा , नानिवली , वाडा-खडकोना या वनक्षेत्राचा विक्रमगड आणि पालघर तालुक्यातील भाग येतो. कासा परिक्षेत्रामध्ये मोठमोठे डोंगर असून घनदाट जंगलाची व्याप्ती जवळपास ५४०० हेक्टरवर आहे . या जंगलांमध्ये बिबटे, वाघ , ससे , माकड असे विविध प्राणी तर वेगवेगळय़ा प्रकारचे पक्षी आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. परंतु उन्हाळा सुरू झाला की काही ठिकाणी वणवा लागून आगी लागतात. तर काही ठिकाणी शिकार करण्यासाठी आगी लावल्या जातात. शेतकरी मिळालेल्या वनपट्टय़ामध्ये भाताचे रोप लावण्यासाठी राब म्हणजेच जमीन भाजतात. परंतु या सर्वामुळे जंगलात मोठय़ा प्रमाणावर आग लागते. आग लागल्यामुळे वैविध्यपूर्ण अशा वनस्पतींची व जैवविविधतेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते.
जंगलात लागणाऱ्या आगी नियंत्रणात आणण्यासाठी उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये कंत्राटी पद्धतीने जास्तीचे कर्मचारी वनपरिसरामध्ये तैनात केले जातात. आग लागल्यानंतर जोराचा वारा व सुकलेला पालापाचोळा असल्याने आग वेगाने फोफावते.– जितेंद्र कुराड, उपविभागीय वन अधिकारी, डहाणू