गेल्या २५ वर्षांपासून चारच व्यावसायिक विषयांचे शिक्षण; शिक्षक, कर्मचाऱ्यांचीही कमतरता

रमेश पाटील
वाडा:   शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या वाडय़ातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अवस्था दयनीय झाली आहे. २५ वर्षांपासून या ठिकाणी फक्त चारच व्यावसायिक विषय (ट्रेड) शिकविले जात आहेत. औद्योगिक क्षेत्र असतानाही त्या दृष्टीने रोजगारविषयक शिक्षण नसल्याने विद्यार्थ्यांचीही कुचंबणा होत आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता हा प्रश्न सातत्याने भेडसावत असल्यामुळे ही संस्था नसल्यासारखीच झाली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन २९ सप्टेंबर १९९५ रोजी तत्कालीन ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले होते. सुरुवातीला दहा र्वष ही प्रशिक्षण संस्था वाडा शहरात कार्यान्वित होती. अपुऱ्या जागेमुळे या संस्थेचे स्थलांतर वाडा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली येथील बंद पडलेल्या दुग्ध प्रकल्पाच्या भव्य इमारतींमध्ये करण्यात आले.

पाच एकरहून अधिक क्षेत्र असलेली जागा व तीन भव्य इमारती असतानाही या ठिकाणी फक्त फॅशन टेक्नॉलॉजी, कर्तन व शिवण, संधाता (वेल्डर), विजतंत्री (इलेक्ट्रिशन) हे चार कोर्स (ट्रेड) येथे शिकवले जातात. गेल्या २५ वर्षांत याव्यतिरिक्त या भव्य जागेत नव्याने अत्यावश्यक असणारे विषय सुरू न केल्याने येथील विद्यार्थी शहरी भागात जाऊन विविध विषयांचे प्रशिक्षण घेत आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या चार विषयांसाठी दरवर्षी फक्त १२० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. वर्षांला लाखो रुपये या संस्थेवर खर्च करून अवघे १२० विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत.

वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असून या ठिकाणी सातशेहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने सुरू आहेत. या उद्योगात मोठय़ा प्रमाणावर रोजगाराची संधी  उपलब्ध आहे. मात्र आवश्यक असलेले प्रशिक्षणार्थी येथील स्थानिक गाव, खेडय़ातून उपलब्ध होत नसल्याने या उद्योगात बाहेरून येणारे कामगार काम करीत आहेत.

तारतंत्री (वायरमन), डिझेल मेकॅनिकल, मोटार मेकॅनिकल, फिटर (जोडाई), संगणक दुरुस्ती, टुल्स अ‍ॅंड डायमेकर असे विषय या ठिकाणी सुरू होणे अपेक्षित असताना गेल्या २५ वर्षांत या समस्येकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. येथील विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी केल्यानंतरही येथील प्राचार्यानी डिझेल मेकॅनिकल, जोडाई (फिटर), तारतंत्री असे विषय महत्त्वांचे विषय प्रस्तावित केलेले नाहीत.

या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षक, कर्मचारी यांची वानवा आहेच, परंतु गेली अनेक वर्षे या संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य दिलेला नाही. सध्या येथे भिवंडी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एन. एन. लवटे यांच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवंडी व याच शहरातील एका तंत्रज्ञान विद्यालयाचा पदभार आहे. असे असतानाही वाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा त्यांच्याकडे पदभार दिल्याने ते महिनाभरातून एक ते दोन वेळा येऊन हजेरी लावतात. अन्य शिक्षक वर्ग व कर्मचारी या ठिकाणी राहात नसल्याने तेसुद्धा आठवडय़ातील निम्मे दिवस गैरहजर असतात.

शिक्षक, कर्मचारी या ठिकाणी कुणीही निवासी राहात नसल्याने या प्रशिक्षण इमारत परिसरात गवताचे रान माजले आहे. संस्थेच्या एका इमारतीची पडझड झाली आहे.  प्रशिक्षणार्थी मुलींना राहण्यासाठी या ठिकाणी वसतीगृहाची भव्य इमारत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीमध्ये साफसफाई केलेली नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. पावसाच्या पाण्याने गळती होऊन गवत (तण), अन्य वनस्पतींची झाडे या इमारतीमध्ये उगवली आहेत. एकंदरीत या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अवकळा आली  असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच (१५ जुलै) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील दुरवस्थेबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना निवेदन देऊन या ठिकाणी आवश्यक असलेले विषय (कोर्स) तातडीने सुरू करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

तंत्र सल्लागार समिती कागदावरच

या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तंत्र सल्लागार समिती आहे. या समितीचे सदस्य वर्षोनुवर्षे या संस्थेकडे फिरकलेले नाहीत. या समितीचे अध्यक्ष आमदार असतात. मात्र गेल्या सात वर्षांत येथील आमदार शांताराम मोरे यांनी या संस्थेला भेट दिली नसल्याचे सांगितले जात आहे.

येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरवस्थेमुळे तालुक्यातील औद्योगिकीकरणाचा फायदा येथील तरुणांना घेता येत नाही. त्यामुळे हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र शोभेचे बाहुले झाले आहे.

-देवेंद्र भानुशाली, सामाजिक कार्यकर्त्यां, वाडा.

विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी काही विषय (ट्रेड) सुरू करण्याचे प्रस्ताव लवकरच पाठविणार आहोत.

– एन. एन. लवटे , प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाडा.