तिसऱ्या लाटेची खबरदारी; संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मोहीम

पालघर : मुंबई व उपनगरात करोना नियंत्रणात आल्याने मुंबईमधील विविध प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा लाभ घेऊन पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमधील संशयितांची आरटीपीसीआर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या आव्हानाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन करोना असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन संसर्ग नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने तपासणीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

करोनाच्या दुसऱ्याला लाटेदरम्यान मुंबई येथील प्रयोगशाळेत करोना तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने तसेच तपासणी नमुने पाठवण्यावर मर्यादा असल्याने लक्षण असणाऱ्या रुग्णांची प्रतिजन चाचणी करण्यात येत असे. सद्य:स्थितीत मुंबई व उपनगरातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने मुंबई येथील विविध प्रयोगशाळांमध्ये जिल्ह्यातील सुमारे एक हजार आरटीपीसीआर नमुने पाठवण्याची सुविधा प्राप्त आहे.

फेब्रुवारी ते जून महिन्यांदरम्यान जिल्ह्यात संक्रमणाच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट ठरलेल्या सर्व गावांची यादी तयार करण्यात आली आहे.  या ठिकाणी आजाराचा संसर्ग असल्याचा संशय असलेल्या किंवा लक्षणे असणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे मदत घेण्यात येत असून करोना रुग्ण सुप्तपणे आजार पसरण्याची तसेच तिसऱ्या लाटेचा उगम करण्याच्या दृष्टीने रोख लावण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने स्वाभाविकपणे रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तपासणी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबरीने नागरिकांमध्ये निर्माण झालेली आजाराविषयीची भीती कमी झाल्याने नागरिक तपासणीसाठी पूर्वीप्रमाणे पुढे येत नसल्याचे देखील दिसून येत आहे.

करोनाची तिसरी लाट पुढील तीन-चार आठवड्यात सुरू होईल अशी शक्यता राज्य कृती दलाने भाकित वर्तवले असून या पाश्र्वाभूमीवर आजाराच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रमाणात प्रतिबंध ठेवणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाचा कल आहे. त्यादृष्टीने करोना निर्बंधाच्या श्रेणी तीन मध्ये असलेल्या पालघर जिल्ह्याला श्रेणी तीन मधून वरिष्ठ श्रेणी मध्ये आणण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी विशेष उत्सुक नसल्याचे दिसून येते.

आकड्यांचा खेळ

रुग्णवाढीच्या (संसर्ग) दराची (पॉझिटिव्हिटी रेट) गणना करताना आठवडाभराच्या कालावधीत आढळलेल्या करोना रुग्णसंख्येला त्याच कालावधीत केलेल्या तपासणीच्या संख्येने भागाकार केला जातो. त्यामुळे अधिक तपासणी करून रुग्णसंख्या कमी आढळल्यास पालघर जिल्हा तिसऱ्या श्रेणीमधून दुसऱ्या श्रेणीमध्ये आणणे हा आकड्यांचा खेळाचा भाग ठरणार आहे. काही आठवड्यांपूर्वी मोखाडा, तलासरी, विक्रमगड आदी भागांत लक्षणे नसलेल्या नागरिकांची प्रतिजन तपासणी करण्यात येऊन त्यांच्या नकारात्मक अहवालाच्या आधारे जिल्ह्याने दुसरी श्रेणी गाठल्याची माहिती पुढे आली आहे. उपलब्ध साधनसंपत्तीचा इष्टतम वापर करण्याच्या दृष्टीने सध्या प्रतिजन चाचणीऐवजी आरटीपीसीआर चाचणीवर भर दिला जात आहे.

डेल्टा प्लस विषाणूचा रुग्ण

एप्रिल महिन्यात डहाणू येथील प्रयोगशाळेतील सखोल संशोधनासाठी (संपूर्ण जिनोमॅटिक सिक्केन्सिंग) तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये एका महिलेच्या नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस पद्धतीचा उत्परिवर्तन झालेला विषाणू आढळल्याचे डीएमईआरने अलीकडेच जाहीर केले आहे. त्या दृष्टीने संबंधित रुग्णावर देखरेख ठेवण्यात आली असून त्याच्या जोखीम संपर्कात आलेल्या रुग्णांची  तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या रुग्णाच्या प्रवास इतिहासाची माहिती घेण्यात आली असून या विषाणूच्या प्रकाराची शहानिशा करण्याच्या दृष्टीने संशोधन व तपास सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या डेल्टा प्लस प्रकारचा विषाणू आढळलेल्या रुग्णाने आजाराचा प्रसार किती प्रमाणात केला, आजाराचे गांभीर्य किती होते, हा उत्परिवर्तन झालेला विषाणू आगामी काळात त्रासदायक ठरणार आहे का? याबाबतचा अभ्यास एनआयव्ही व डीएमईआरने सुरू केला असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.