पालघर : जिल्हा परिषद शाळेतील 2,72,213 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 16,25,138 पाठयपुस्तके तर अंशत: अंध (अपंग) १०३ विद्यार्थ्यांसाठी ठळक अक्षरातील (लार्ज प्रिंट) 679 पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असून ही पुस्तके शासनाच्या बालभारती विभागाकडून जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठयपुस्तका अभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठयपुस्तके ही योजना सुरु आहे.
पालघर जिल्ह्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व शासन अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या दोन लाख ७२ हजार २१३ विद्यार्थ्यांच्या हातात १५ जून रोजी पुस्तकाचा संच देण्यात येणार आहे. यामध्ये मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती भाषांच्या पुस्तकांचा समावेश आहे. १६ लाख २५ हजार १३८ पुस्तकांचे संच तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी संख्येच्या हिशोबाने तालुका स्तरावरून केंद्र स्तरावर व शाळा स्तरावर पोहोचविण्यात आली आहेत.सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. शासनाकडून पुस्तके प्राप्त झाली असून ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.
पाठ्यपुस्तकांची वाहतूक
मोफत पाठ्यपुस्तके योजना सन २०२५ – २६ करिता विभागीय पाठयपुस्तके भांडार ते तालुकास्तर या टप्प्यातील पाठयपुस्तकांची वाहतूक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाचे वाहतूकदार यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठयपुस्तके वाहतूक संबंधित तालुका स्तरावरून ठरविण्यात आलेल्या पुरवठादार मार्फत करण्यात येणार आहे. पाठयपुस्तके वितरणाची तारीख पंचायत समितीतील सर्व संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येईल, शाळा उघडण्यापूर्वी सर्व साधारणपणे सात दिवस आधी ही पाठयपुस्तके संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात येतील. गावातील पदाधिकारी / अधिकारी / पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके समारंभपूर्वक वितरण, ज्या दिवशी शाळा उघडेल त्याच दिवशी करण्यात येईल.
पालघर तालुक्यात पुस्तके दाखल
पालघर जिल्हयास बालभारती पनवेल बुक डेपोकडून पाठयपुस्तकाच्या वाहतूकीस सुरुवात झाली आहे. 15 मे रोजी पनवेल बुक डेपो कडून पालघर जिल्हयातील पालघर तालुक्याकरीता पाठयपुस्तकाच्या तीन गाडया आलेल्या असून एकूण 29 टन पाठयपुस्तके प्राप्त झाली आहेत. पालघर तालुक्याचे पाठयपुस्तकांची साठवणूक जिल्हा परिषद शाळा टेंभोडे येथे करण्यात आली आहे. या गाडयांचे स्वागत शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर व पालघर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय वाघ यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी समग्र शिक्षाचे रुपेश पवार जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण हे उपस्थित होते.