पालघर : शिवसेनेतून शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना)  प्रवेश करताना मुख्यमंत्री व त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली आश्वासने जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत पाळली न गेल्याने  शिंदे गटातील सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ सदस्य नीता पाटील, विनया पाटील, मिताली बागुल, अरुण ठाकरे, मंगेश भोईर, राजेश मुकणे हे सभापतीपदासाठी इच्छुक  होते. यापैकी बहुतांश सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत भागदेखील घेतला. मात्र मुख्यमंत्री यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार शिवसेनेने निवडणूक लढवण्याचा निर्णय न घेतल्याने हे सर्व सदस्य नाराज झाले. काही महिला सदस्यांना  अश्रू लपवता आले नाही.  अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी अध्यक्ष यांच्या दालनात मोठय़ा प्रमाणात खडाजंगी झाल्याची सांगण्यात येते. काही सदस्यांनी पक्षादेश धुडकावून राजीनामा देण्याची तयारीदेखील दर्शवली होती, परंतु जिल्हाप्रमुख राजेश शहा, माजी अध्यक्ष वैदेही वाढण व विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांनी नाराज मंडळींची समजूत काढण्यात यश मिळविले.

पक्षांतरासाठी शिंदे गटातर्फे २० सदस्य संख्या असणाऱ्या शिवसेनेच्या काही सदस्यांवर दबाव टाकण्यात आला होता. ठाणे येथील एका नेत्यांनी काही सदस्यांना सभापतीपदाची अभिलाषा दर्शवली होती, परंतु ती फोल ठरली, असे सांगण्यात आले.

आशा संपुष्टात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहुजन विकास आघाडीला महिला बालकल्याण सभापतीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. या पदासाठी तीन कार्यकाळ सदस्य राहिलेल्या भावना विचारे यांनी अर्ज भरला होता. मात्र बविआच्या वाटय़ाला समाज कल्याण विभाग आल्याने त्यांची सभापतीपदी नियुक्ती होण्याची आशा संपुष्टात आली. नाराज झालेल्या भावना विचारे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.