scorecardresearch

राज्यमार्गावर कचऱ्याचे साम्राज्य

कासा-चारोटी या मुख्य राज्यमार्गालगत नागरिक कचरा फेकत असल्याने, रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना आपले नाक मुठीत घेऊन जावे लागत आहे.

कोटय़वधींचा निधी असूनही कासा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांची नाक मुठीत धरून कासा-चारोटी रस्त्यावरून मार्गक्रमण
कासा : कासा-चारोटी या मुख्य राज्यमार्गालगत नागरिक कचरा फेकत असल्याने, रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना आपले नाक मुठीत घेऊन जावे लागत आहे. कासा ग्रामपंचायत डहाणू तालुक्यातील एक प्रमुख आणि मोठी ग्रामपंचायत आहे. कोटय़वधी रुपयांचा निधी कासा ग्रामपंचायतीकडे असूनही कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याकडे कासा ग्रामपंचायत दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
कासा ग्रामपंचायत हद्दीमध्ये कासा – चारोटी या मुख्य राज्य मार्गावर पोस्टाजवळ तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या जवळ ग्रामपंचायतीने कचराकुंडय़ा ठेवल्या आहेत. या कचराकुंडय़ा कचऱ्याने भरूनसुद्धा ग्रामपंचायतकडून त्या वेळच्या वेळी उचलल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. ओला-सुका असा सगळय़ाच प्रकारचा कचरा एकत्र टाकला जात असल्याने हा कचरा कुजून त्यांची अत्यंत उग्र दुर्गंधी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना सहन करावी लागत आहे.
कासा ग्रामपंचायत हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न फार गंभीर बनला आहे. कोटय़वधी रुपयांचा निधी ग्रामपंचायत खात्यामध्ये पडून असताना देखील ग्रामपंचायत कचऱ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कासा ग्रामपंचायत हद्दीमध्ये कासा शिवमंदिराची मागील बाजू, पार्वती निवास, सायवान नाका, डोंगरीपाडा अशा अनेक भागांत कचराकुंडय़ा नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. तरी ग्रामपंचायतीने कचऱ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कचऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Empire waste state highways casa gram panchayat neglects despite crore fund citizens walk casa charoti road holding noses amy

ताज्या बातम्या