कासा : आदिवासी भागात तिथल्या कलेला जितकी मागणी आहे, तितकीच तेथील रानमेव्याला. या रानमेव्यातून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, पण प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्षच होताना दिसते.
जव्हार-मोखाडा तालुका हा आदिवासीबहुल तालुका. डोंगरदऱ्यांनी, जंगलांनी येथील परिसर नटलेला आहे. या जंगलपट्टय़ात निरनिराळय़ा प्रकारच्या रान वनस्पती, फळे, फुले वर्षभर मिळतात. आदिवासी लोक त्याला रानमेवा म्हणतात. या मेव्याविषयी आपणही अनकेदा वाचले असेल. कधी तो चाखलाही असेल. तर हा रानमेवा विविध फळे, त्यांच्या बिया, मोहोर आदी असतो. या परिसरातील आदिवासी चरितार्थ चालवण्यासाठी जंगलातून हा मेवा गोळा करतात आणि भिवंडी, कल्याण, वसई, विरार, पालघरच्या बाजारांत नेऊन त्याची विक्री करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदल, अनियमित ऋतुमान या सगळय़ाचा रानमेव्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळेच हा वारसा जपणे अत्यंत आवश्यक आहे.
बचतगटाच्या माध्यमातून रानमेव्याची संघटित विक्री केल्यास लाखोंची उलाढाल होऊ शकते. चांगले उत्पन्नही मिळू शकते. यामुळे अनेक महिला स्वावलंबी होऊ शकतात. गावठी रानमेव्याला विशेष मागणी आहे. या पट्टय़ातील अनेक आदिवासींना दुर्मीळ आणि औषधी वनस्पतींची जाण आहे. वसंतात फुलणाऱ्या अनेक वनस्पतींपासून आयुर्वेदिक औषधी बनतात. त्यांचा वर्षभर चांगल्या प्रकारे वापर करता येतो. काही आदिवासी वसंत ऋतुमध्ये औषधी वनस्पतींचे वाटे गोळा करून ठेवतात. आंबा आणि कोय, करवंदे, जांभूळ, काजू, फणस, आवळा, अडुळसा, कोरफड, मोहाची फुले आदी साठवून ठेवतात. त्याचे वैद्यकीय उपयोग आहेत. ताप, कावीळ, डायेबिटिस आणि त्वचा रोगांसाठी रानमेव्यातील अनेक फळे रामबाण उपाय आहेत. या औषधी गुणधर्माकडे लक्ष देऊन रानमेव्याच्या विक्रीसाठी काही ठोस धोरणे आणणे गरजेचे आहे.
रानमेव्यातील फळांपासून घरगुती खाद्यपदार्थ तयार करता येऊ शकतात. आदिवासी महिलांना त्याचे प्रशिक्षण दिल्यास येथील कुटुंबांसाठी हा मोठा उत्पन्नाचा स्रोत होऊ शकेल. आमसुले, कोकम सरबत, काजूगर आणि काजूबर्फी, आंबापोळी, फणसपोळी, सुकवलेले गरे, कच्च्या करवंदांचे लोणचे, इतरही फळांची लोणची, आवळा सुपारी, मोरावळा, मुरांबा आदी पदार्थ येथील महिला नक्कीच बनवू शकतात आणि विकूही शकतात. त्यातून चांगले उत्पन्न आणि व्यवसायाच्या संधी तयार होतील. परंतु त्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. रानमेवा आणि एकूणच या सगळय़ा जंगलसंपत्तीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात येथे रोजगाराची समस्या कमी होईल.
यासंदर्भात मानव विकास योजनेंतर्गत बचत गटांना रान मेवा किंवा इतर फळे ही खरेदी करण्यासाठी माहिती आणि प्रोत्साहन दिले जात आहे.- दिलीप नेरकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2022 रोजी प्रकाशित
रानमेव्यातील रोजगारसंधी अजूनही दुर्लक्षितच; रानमेव्यापासून पदार्थ बनवणे, विक्री करण्यासाठी महिला बचतगटांना प्रशिक्षण देण्याची गरज
आदिवासी भागात तिथल्या कलेला जितकी मागणी आहे, तितकीच तेथील रानमेव्याला. या रानमेव्यातून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, पण प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्षच होताना दिसते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 30-03-2022 at 02:04 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunities legumes neglected train women self help groups make sell products legumes amy