पालघर :सर्वसामान्य नागरिकांना निसर्गाचा अनुभव मिळावा तसेच जैवविविधता, आदिवासी संस्कृतीचे जतन करून पर्यटन केंद्र निर्माण होण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा मुख्यालयाच्या जळगाव ९१ हेक्टर जागेवर वन उद्यान उभारण्याचे वन विभागाने निश्चित केले आहे.
पालघर जिल्ह्यात झपाट्याने नागरीकरण व औद्योगीकरण होत असताना परिसरातील नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता यावा या दृष्टीने तसेच अभ्यासकांसाठी जैवविविधतेची अनुभूती मिळावी या दृष्टीने या वन उद्यानाची आखणी करण्यात आली आहे.
वनविभागाच्या पालघर व खारेकुरण गावा दरम्यान व पालघर रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ९१ हेक्टर संरक्षित वनक्षेत्राची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. या वनस्पती उभारणी करताना जागतिक पातळीवर या पद्धतींच्या उद्यानांचा अभ्यास करण्यात आला असून त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण बाबी या प्रकल्पात अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही जागा सपाट असल्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झोन (विभाग) करणे व टप्प्याटप्प्यात विकसित करणे शक्य होणार असून वृक्ष लागवडीसाठी जमीन अनुकूल असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या उद्यानाच्या ९० मिनिटांच्या परिघात पाच दशलक्ष नागरी वस्ती असून यामुळे या वन उद्यानाला (जीवन्य थीम पार्क) ला नागरिकांचा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे. या वन उद्यानामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांसाठी उपजीविकेचे साधन निर्माण होणार असून पर्यावरणीय पर्यटन व पर्यावरणीय बफर झोन निर्मित होण्यास मदत होणार आहे.
वन ज्ञान, सांस्कृतिक अभ्यास व भविष्याचा वेध घेऊन या उद्यानाची आखणी करण्यात येणार असून या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारचे विभाग (झोन) करण्यात आले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने या उद्यानाची आखणी करण्यात आली आहे. या उद्यानात पर्यावरणपूरक साहित्याद्वारे आवश्यक तितक्या प्रमाणात दालनांची उभारणी करण्यात येणार असून यापैकी काही दालन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय या वन उद्यानात निसर्गाविषयी व वेगवेगळ्या झाडांच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या वन उद्यानात नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विशेष निसर्ग मार्ग उभारण्यात येणार असून याविषयीच्या अभ्यासकाला विविध नैसर्गिक घटकांचा अभ्यास व त्यावर संशोधन करण्यासाठी पूरक ठरेल अशा प्रकारचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डहाणूचे उप वनसंरक्षक निरंजय दिवाकर यांनी वन तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर सादरीकरण करताना सांगितले. या उद्यानाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त होणार असून त्याच बरोबरीने या उद्यानाच्या उभारणीत सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहणार आहे. आवश्यकता भासल्यास वेगवेगळ्या उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधी मधून या उद्यानाच्या उभारणीसाठी निधीची उपलब्धता केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
प्रस्तावित प्रमुख वैशिष्ट्ये
आदिवासी सांस्कृतिक ग्राम
वन शिक्षण घुमट आणि व्हर्च्युअल रिॲलिटी व्याख्या केंद्र
बालकांचे कल्पनाविश्व आणि साहसी क्षेत्र
वन आरोग्य आणि उपचार केंद्र
पर्यावरणपूरक निवास आणि निसर्ग कॅम्पग्राउंड
दलदल आणि जैवविविधता प्रदर्शन
MICE कार्यक्रमांसाठी वन परिषद मंडप
खास वैशिष्ट्ये
सुगंधाचे उपवन
वन ध्वनी प्रयोगशाळा
पर्यावरण-टोकन बक्षिसे
डिजिटल निसर्ग खेळ
विविध विभाग
इको लर्निंग झोन, इको तलाव (पौंड), इको मनोरंजन (रिक्रिएशन), इको साहस (एडवेंचर), निसर्ग पार्क (नेचर ट्रेल पार्क), कौशल्य केंद्र (स्किल हब), आदिवासी सांस्कृतिक क्षेत्र (ट्रायबल कॅल्चरल झोन), मुलांची वन कल्पना (चिल्ड्रन फॉरेस्ट इमॅजिनेशन), बांबू सेटन, मियावती फॉरेस्ट, निरोगी वन उपचार (वेलनेस फॉरेस्ट थेरेपी)