स्थानिक आमदार, खासदार यांच्या दुर्लक्षामुळेच रस्त्याची दुर्दशा झाल्याचा आरोप
वाडा : येथील वाडा-भिवंडी या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली असतानाही या समस्येकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने या रस्त्याकडे शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी संघर्ष समितीची स्थापना करून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (३० नोव्हेंबर) तहसीलदार कार्यालयासमोर केलेल्या लाक्षणिक उपोषणामध्ये मनोगत व्यक्त करताना अनेकांनी स्थानिक आमदार, खासदार यांनाच लक्ष्य केले.
वाडा-भिवंडी या राज्य महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे, वाहने नादुरुस्त होत आहेत तरीसुद्धा या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नाही, येथील लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प बसले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वाडा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलनाचा लढा सुरू केला आहे.
मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाला सर्व पक्षांच्या, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी येथील लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेबाबत तोंडसुख घेतले.वाडा तालुक्याला दोन खासदार (कपिल पाटील, राजेंद्र गावित),
तीन आमदार (शांताराम मोरे, दौलत दरोडा, सुनील भुसारा) लाभलेले असतानाही हे पाचही लोकप्रतिनिधी येथील रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगून या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनाही घरचा आहेर दिला. तर या रस्त्याच्या दुरवस्थेला ठेकेदारांसह या ठेकेदारांना पाठीशी घालणारे राजकीय पक्षांचे पदाधिकारीच जबाबदार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय पठारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आजच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणानंतर यापुढे धरणे आंदोलन, रास्ता रोको, जेलभरो अशा प्रकारची आंदोलने करण्यात येतील, असे वाडा-भिवंडी रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले.
महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यास निधी
मनोर-वाडा-भिवंडी या ६५ कि.मी.च्या राज्य महामार्गाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याने या संपूर्ण महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी सा. बां.विभागाने ११५० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग केला तरच मोठा निधी मिळू शकतो, असे येथील सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी. बी. ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर सांगितले.