बोईसर जवळील बेटेगाव येथे कार्पेट कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये चार कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे दोन बंब आणि खाजगी टँकर घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
बोईसर जवळील बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रिस्पॉन्सिव्ह या कार्पेट आणि दोरखंड उत्पादन बनविणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्यामध्ये लागलेल्या आगीमुळे चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. चार पैकी तीन कामगारांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर या रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात आले असून एका कामगारावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्याला आग लागल्याची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले.
त्याचप्रमाणे दोन टँकरच्या मदतीने आग विझवली जात आहे. कारखान्यात ज्वलनशील साहित्याचे उत्पादन होत असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असून घटनास्थळी बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यां कर्मचारी उपस्थित आहेत. रिस्पॉन्सिव्ह या कारखान्यात वर्षभरात आग लागल्याची दुसरी घटना घडली असून यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
