पालघर तालुक्यातील सातपाटी व मुरबे दरम्यान असणाऱ्या खाडीमध्ये आज सकाळी हजारोंच्या संख्येने मासेमृत पडल्याची घटना समोर आली आहे. प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत पावल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मच्छीमार समुदायाने या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज सकाळी साडेनऊ दहाच्या सुमारास मुरबे खाडी मधील पाण्यावर बोई प्रजातीचे मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले. काही वेळानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या मृत माशांची संख्या वाढून ती हजारोच्या संख्येत गेली. तरंगणारे मासे पाहण्यासाठी गावकरी समुद्रकिनारी पोहोचले व त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात यासंदर्भात तक्रार नोंदवली.
हेही वाचा >>>पालघर जिल्ह्यात नेतेमंडळींचे पक्षांतर
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन मृत मासे व खाडीतील पाण्याचे नमुने गोळा केले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान वेगवेगळ्या आकाराचे व इतर प्रजातींचे मासे देखील मृत पावले असून प्रदूषित पाणी हे त्यामागील प्रमुख कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये निर्मित होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे सांडपाणी खोल समुद्रात सात किलोमीटर अंतरावर सोडण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून राबवण्यात येत आहे. तरीदेखील तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या चेंबर मधून ओव्हरफ्लो होणारे पाणी नाल्यांच्या मार्गे खाडीत पोहचत असून लांबलेल्या पावसाच्या पाण्यासोबत प्रदूषित व रासायनिक घटक असणारे सांडपाणी खाडीमध्ये मिसळले असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>कासा: राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये निर्मित होणाऱ्या सांडपाण्यांपैकी सहजगत प्रक्रिया करू न शकणारे सांडपाणी टँकर मधून गोळा करून ते पाणी विशेष सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात येते. मात्र असे अति प्रदूषित असणारे सांडपाणी गोळा करून त्याची वाहतूक करणारे टँकर व्यवसायिक राजकीय पार्श्वभूमीची असून काही टँकर चालक असे अति प्रदूषित पाणी जवळच्या नदी नाल्यामध्ये सोडत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. असा एखादा प्रकार काल रात्री किंवा आज पहाटे घडल्याने खाडी मधील मासे मेल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
या खाडीच्या जवळपास एक कोलंबी प्रकल्पापासून त्या ठिकाणी असणाऱ्या पॉन्ड ची साफसफाई करताना पेस्टिसाइड युक्त पाणी खाडीत सोडल्याने ही घटना घडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे.
मुरबे सातपाटी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी निदर्शनास आली. मी व माझ्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याची व मृत माशांचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठवले आहेत. – राजू वसावे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मुरबे व सातपाटी खाडीमध्ये हजारोच्या संख्येने मासे मेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून त्यामध्ये बोय प्रजातीचे माशांची संख्या अधिक आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात तक्रार नोंदवण्यात आली आहे – मोनालिसा तरे, सरपंच मुरबे