पालघर : बोईसरचे आमदार विलास तरे निवास करीत असणाऱ्या गांजे गावातील एका पावणे पाच वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपल्या बालकाला मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नसल्याचे मृत बालकाच्या पालकांचे म्हणणे असून बालकाची अवस्था गंभीर असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात संदर्भीय सेवेसाठी हलवण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
२९ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास गांजे केळीपाडा येथील घराच्या अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय नऊ महिने वयोमानाच्या मयंक पांडुरंग कोलेकर याला काहीतरी चावल्याचे जाणवले. त्यांनी याबाबत पालकांना माहिती दिल्यानंतर दुचाकीवरून या मुलाला मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शासकीय रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी आपल्यावर कोणतेही उपचार केले नाहीत असे पांडुरंग कोलेकर यांचे म्हणणे असून मुलाची अवस्था गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात नेण्याचे सुचित केले. पुढे मनोर येथील एका खाजगी रुग्णालयात आपल्या मुलाला दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री आठ वाजल्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मनोर येथे शासकीय रुग्णालयात असताना आपला मुलगा शुद्धीवर होता मात्र योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असे आरोप त्यांनी केले आहेत.
या विषयी मनोर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता २९ मे रोजी सायंकाळी उशिराने गंभीर अवस्थेत असणारा एक पाच वर्षीय मुलगा दाखल झाला होता. मात्र त्याची अवस्था गंभीर असल्याने त्यावर सर्पदंश संदर्भात उपचार सुरू करून त्याला संदर्भीय सेवेत समाविष्ट असणाऱ्या जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सर्पदंशाचे उर्वरित उपचार खाजगी रुग्णालयात दिले जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी माहिती दिली. आपल्या मुलावर मनोर ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे उपचार केले नाहीत असे आरोप होत असताना मात्र मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत मुलावर उपचार सुरू केल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत राजगुरू यांनी लोकसत्ता ला सांगितले. मनोर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झाल्यास द्यावयाच्या लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून उपचारा अभावी या बालकाचा मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले आहे.
मृत्यू मागील कारण गुलदस्त्यात
आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या पांडुरंग कोल्हेकर यांनी मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे शवविच्छेदन करण्यास अनुकूलता दर्शवली नाही. त्यामुळे या मुलाला विषारी नागाचा दंश झाला होता का? कि मुलाचे वजन कमी असल्याने तसेच तातडीने आवश्यक उपाययोजना अमलात न आणल्याने विष शरीरात पसरून हा मृत्यू झाला याबद्दल निश्चित कारण समजले कठीण झाले आहे. संदर्भीय सेवेसाठी देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा मृत्यू सर्पदंशने झाल्याचे प्राथमिक निदान केले होते. याबाबत आमदार विलास तरे यांच्याशी संपर्क साधला असता सर्प दंश झालेल्या मुलाचा आपल्या कुटुंबीयांनी मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून मृत्यू मागील कारणाविषयी आपण मनोर ग्रामीण रुग्णालयात चौकशी करणार असल्याचे विचारल्यानंतर सांगितले.
रुग्णवाहिकेचा उपयोग नाही
सर्पदंशचा रुग्ण मनोर रुग्णालयात दाखल होऊन त्यावर उपचार केल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक विभागाचे म्हणणे आहे. मग ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुगालयात या लहान मुलाला दुचाकीवरून का पाठविले, रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा वापर का करण्यात नाही आला असा सवाल उपस्थित केला जात आहे. आपण सुट्टीवरून परातल्यानंतर या प्रकरणात आपण स्वतः चौकशी करू असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत राजगुरू यांनी सांगिलते आहे.