कासा: वातावरण बदलामुळे ऋतुचक्रातील बदलाचा फटका राभाज्यांना बसल्यामुळे यावर्षी त्या हंगामा आधीच उगविल्या आहेत. दरवर्षी मृगाच्या पावसामध्ये उगवणारी रानभाजी यंदा अवकाळी पावसामुळे लवकर उगवली असून त्या विक्रीसाठी बाजारात येऊ लागली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगविणाऱ्या विविध रानभाज्या पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उगवलेल्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतात. तसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात. परंतु पावसाअगोदर म्हणजेच मे महिन्यातील अंशतः ढगाळ वातावरणात शेवळी नावाची भाजी उगवते. शेवळी उगवली कि, लवकरच पावसाला सुरवात होणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांना मिळताच शेत मशागत उरकण्याच्या कामाला शेतकरी सुरवात करतो. अशी हि शेवळी भाजी यंदा हंगामापूर्वीच उगवल्याने ती सध्या ग्रामीण भागात विक्रीसाठी येत आहे.
जून महिन्यात येणाऱ्या रानभाज्या, मे महिन्यातच अवकाळी पावसामुळे सर्वत्र जंगलात माळरान परीसरात कोली, रान तेरा, आकऱ्या, उळसा, करटुल, आंबटवेल, कोळु, कांचन, रान ज्योत, भरडा या भाज्या बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. सध्या त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, ठाणे, पालघर परीसर हा रानभाज्यांनी अधिक फुलून गेला आहे. जंगलात अनेक वेली, फळे, फुले आदी. वनस्पती ही औषधाचा भाग म्हणून आणि चवीला रुचकर असल्यामुळे खवय्ये आपल्या आहारात आवर्जून समावेश करून ताव मारत आहेत.
अनेक रानभाज्यांमध्ये पूर्ण वर्षात फक्त काही दिवस मिळणारी रानभाजी म्हणजे शेवळी हि भाजी अनेक ठिकाणी विविध प्रकारे बनवली जाते. पालघर जिल्ह्यात हि चविष्ट भाजी आमटी, पातळ व सुकी भाजी शाकाहारी व मांसाहारी अश्या विविध प्रकारात बनवली जाते.
दरसाल मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर वसईच्या पूर्व भागातील जंगल पट्टीत शेवळी उगवायला सुरवात होते. शेवळी उगवली म्हणजे पावसाळा अगदी जवळ आला असल्याचे येथे मानले जाते व त्याप्रमाणे शेतीच्या कामांसह पावसाळ्यापूर्वीच्या कामांचे नियोजन केले जाते. उगवणारऱ्या या शेवळ्यांचा या भागात वर्षात जेमतेम एका महिन्यासाठी मिळणारी एक पौष्टिक, रुचकर व औषधी भाजी म्हणून जेवणात वापर केला जातो.
भाजी बनवताना काळजी घ्यावी ही भाजी बनवताना शेवळी चिरताना खास काळजी घ्यावी लागते, मध्यभागी असणाऱ्या बोंडाला खाज खुजली असते ते काढून टाकतात. भाजी चिरताना राहून गेलेली खाज, काकडं, आंबडी पाला ह्यांचे आंबट (आम्लारी मिश्रणाने खाज विरघळून जातात, आणि भाजी खाण्यायोग्य होते अन्यथा खाणे मुश्किल होते. यासाठी ही भाजी करताना अनुभवी माणसाचा गृहिणीचा सल्ला जरूर घ्यावा. किंवा विक्री करणाऱ्यांकडून टिप्स जाणून घ्याव्यात कुठल्याही खताशिवाय, पाण्याशिवाय न लागवड करता निसर्गतः रानोमाळ उगवणारी, विविध ऋतुमानाप्रमाणे येणारी फळे, भाज्या ही आरोग्यासाठीअत्यंत पोषक असतात.