पालघर/ डहाणू : गावदेव उत्सवातील एक दिवस आदिवासी घर सोडून जंगलात जातात. दुपारचे जेवण जंगलातच रांधतात आणि ते जेवून मग सायंकाळी घरी परततात. यामागील प्रथा अशी आहे की, गावच्या वेशीवर रक्षण करीत बसलेला ग्राम क्षेत्रपाल अर्थात प्रत्येकाच्या घरी जातो नि सुरक्षा निश्चित करतो. ही आख्यायिका मानून आजही आदिवासी जंगलात जाऊन भोजन करतात. 

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात निसर्ग पूजनाच्या परंपरा जोपासणाऱ्या गावदेव उत्सवाला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. आदिवासी वाघ्या, हिरवा देव, हिमाय देव, नारान देव, बहरम देव, धरतरी, कनसरी, गावतरी यांची पूजा करतात. गावांमध्ये गावाच्या वेशीवर किंवा गावात गावदेव असतो. गावदेव हा दगडात किंवा लाकडात कोरलेला असतो. त्यावर वाघ, सूर्य, चंद्र ही चिन्ह कोरलेली असतात. गावदेवाला त्या गावचा रक्षक मानले जाते.  लग्न, साखरपुडा, नवी वास्तू उभारणे आदी कार्यक्रमांमध्ये देवाला पहिला मान दिला जातो.  गावदेवाची पूजा दरवर्षी दिवाळीनंतर प्रत्येक गावच्या ठरावीक वेळेनुसार सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते.  ही पूजा सलग तीन दिवस चालते तिसऱ्या दिवशी देवाला बोकडाचा नैवेद्य देऊन सर्व गावात प्रसाद वाटला जातो.  काही गावांमध्ये  गावदेवनिमित्त एकदिवसीय यात्रा भरवली जाते.  यात्रेत पारंपरिक तारपा नृत्याच्या तालावर ठेका धरत नाचगाणे होते. आताच्या काळात यात्रेत डी. जे. लावण्याला जास्त पसंती दिली जाते.  तरी तराप्याचे सूर कानावर पडल्याशिवाय  उत्सव साजरा होत नाही.  पूजेदरम्यान दर पाच वर्षांनी गावाच्या वेशीवर तोरण बांधले जाते.  कार्यक्रमावेळी गावातील ग्रामस्थ  कुटुंबासोबत पहाटे घर सोडतात व जंगलात जाऊन राहतात, दुपारचे जेवण करून  संध्याकाळी घरी येताना वेशीवरील तोरणाखालून गावात प्रवेश करतात. तोरण बांधण्याच्या कार्यक्रमादिवशी ग्राम क्षेत्रपाल देव गावातील प्रत्येक घरात प्रवेश करतो, अशी आख्यायिका आहे.

वादांना तिलांजली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावदेवनिमित्त गावातील सर्व नागरिक एकाच ठिकाणी जमतात आणि यावेळी गावातील समस्या, आपसांतील वाद-विवाद सोडवले जातात. यावेळी सर्वाना मत मांडण्याचे स्वातंत्र्य असते. एकूणच गावात शांतता व सुव्यवस्था राखत नागरिकांनी सर्वासोबत एकजुटीने राहून ऐक्य साधले पाहिजे हा हेतू असतो. कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्य करणारे लोकही गावदेव पूजेच्या कार्यक्रमानिमित्त आवर्जून गावात उपस्थित राहतात.