पालघर: कार्यकुशलतेने आणि कर्तव्यनिष्ठेने ग्रामपंचायत व्यवस्थापनात गोऱ्हे व मनोर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केलेल्या भरीव कामगिरी बाबत त्यांना राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव पुरस्कार सोहळा २७ मे रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी सन २०२२-२३ करिता पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायत अधिकारी नितीन देऊ पवार आणि सन २०२३-२४ करिता वाडा तालुक्यातील गोऱ्हे ग्रामपंचायत अधिकारी दिपक पांडुरंग पाटील यांना राज्यपाल पी. सी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत (साप्रवि), चंद्रशेखर जगताप (ग्रामपंचायत) उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातून एकाच वेळी दोन अधिकाऱ्यांना सलग दोन वर्षे पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान वाढला असल्याचा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.
ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला जातो. हे अधिकारी आपल्या कार्यकुशलतेने आणि कर्तव्यनिष्ठेने ग्रामपंचायत व्यवस्थापनात भरीव कामगिरी बजावत असून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
आदिवासी समाजाच्या खऱ्या विकासासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी डिजीटल सेवा, ऑनलाईन पोर्टल्स आणि संगणकीय प्रणाली यांचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.