डहाणू: डहाणू तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवस्थान येथे १२ एप्रिल रोजी सुरू झालेली जत्रेची २७ एप्रिल रोजी सांगता झाली. जत्रेच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होणारी आगोटीची खरेदी जत्रा संपल्यानंतर देखील सुरू आहे. जत्रेतील कांदा, लसूण, माश्यांचे जाळे, सुकी मासळी, मसाले इत्यादी पदार्थ पावसाळ्यासाठी खरेदी करून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक गर्दी करत आहेत.

पंधरा दिवस चालणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या जत्रेमध्ये सुरुवातीचे आठ दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जत्रेच्या सुरुवातीला जत्रेत अपेक्षित गर्दी पाहायला मिळाली नाही. दुसऱ्या टप्प्यात मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. जत्रेचा शेवटचा टप्प्यात आगोटीच्या खरेदीला सुरुवात झाली असून जत्रा संपल्यानंतर देखील आगोटीची खरेदी सुरू आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने सध्या कांदा, लसूण, मसाले आणि सुकी मासळीची आगोटी करून ठेवण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

आगोटीच्या खरेदीसाठी जत्रेत पूर्वापार पासून चालत आलेली देवाण घेवनीची पद्धत अजूनही त्याच पद्धतीने जपली जात असल्यामुळे आदिवासी बांधवांना जंगलातील वनस्पतींच्या बदल्यात आगोटीची खरेदी करता येते या पद्धतीला “भारोभार” पद्धत म्हणतात. जंगलात मिळणाऱ्या काजू, कुंजा, रिठा, बुऱ्हाडा, कागोले, डिंक इत्यादी वनस्पतींच्या बदल्यात कांदे, लसूण, बटाटे, तेल आणि मसाल्यांची खरेदी करता येत आहे. जंगलातील पदार्थांच्या वजनाच्या बदल्यात त्यांच्या योग्यतेप्रमाणे भाव ठरवून त्यांचा बदल्यात कांदा-लसूण किव्वा इतर जिन्नस दिले जात आहेत. पालघर जिल्ह्यासह नाशिक, मालेगाव, संगमनेर तालुक्यांतून मोठमोठे कांदा – लसूण आणि मसाले व्यापारी जत्रेत दुकाने घेऊन आले असून त्यांना पालघर जिल्ह्यामधील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भाव –
काजू – १०० ते ११० रू. किलो
कुंजा (लाळगुंज) – १०० ते ११० रू. किलो
रिठा – ४० ते ५० रू. किलो
साग बी – ३० ते ३५ रू. किलो

जत्रेत आगोटीच्या खरेदीसाठी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून नागरिक येतात. त्याच्याकडील जंगली वनस्पतींच्या बदल्यात आम्ही त्यांना कांदे, लसूण व इतर जिन्नस देतो. आमच्याकडे जमा झालेल्या जंगली वनस्पती आम्ही मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्री करतो. या पद्धतीमुले गिऱ्हाईकांसह आम्हालाही चांगला नफा मिळवता येतो.- प्रमोद कपाकर, कांदा व्यावसायिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही जंगलात आणि शेतात मिळणाऱ्या वनस्पती वर्षभर साठवून ठेवतो. महालक्ष्मी जत्रेच्या वेळी या वस्तू व्यावसायिकांना देऊन त्या बदल्यात कांदे लसूण आणि इतर पदार्थ घेतो. यामुळे आमच्या वर्षभराची मेहनत फळाला येते.- मनीषा धापशी, ग्राहक