पालघर : गेल्या आठवडा अखेरीपासून पावसाने पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली आहे, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे सखल भागात आणि रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पालघर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाच्या नवली भुयारी मार्गाला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून मार्ग पाण्याखाली गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासह आज पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून उद्या रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवार सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू असून शुक्रवार सकाळी आठ वाजल्यापासून शनिवार सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शनिवार सकाळ आठ वाजल्यापासून १७ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वसई तालुक्यात १४४.५ मिलिमीटर त्या पाठोपाठ पालघर तालुक्यातील ११६.७ मिलिमीटर, डहाणू तालुक्यात ४३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात १६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून १८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजल्यापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोर धरला आहे.

शनिवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नवली, वेऊर, कमारे, वरखुंटी यांसारख्या गावांना जोडणारा नवली भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. हा मार्ग बंद झाल्यामुळे पूर्व-पश्चिमेला प्रवास करणाऱ्या नागरिकांना जवळपास अडीच ते तीन किलोमीटरचा वळसा घालून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाया जात असून गैरसोय होत आहे.

पादचारी आणि हलक्या वाहनांसाठी हा पूल लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी नागरिक पावसाळ्यापूर्वीपासून करत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन याकडे सतत दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांना पावसाळ्यात आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

भुयारी मार्गातून प्रवास करायचा कसा

नवली फाटक बंद झाल्यावर नागरिकांच्या सोयीसाठी हा भुयारी मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र थोडा जरी पाऊस पडला तरी या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि अक्षरशः नाल्याचे स्वरूप येते, ज्यामुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. स्थानिक नागरिक वारंवार प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करत आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची संथ गती देखील गैरसोयीला कारणीभूत ठरत आहे.

पालघरमध्ये पावसाचा ‘रेड अलर्ट’

पालघर जिल्ह्यासाठी १९ ऑगस्ट रोजी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर पुढील पाच दिवस जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

भात पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, भाजीपाला आणि फळबागांमधून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे, पुढील काही दिवस शेतीची कामे पुढे ढकलण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

धरण १०० टक्के भरण्याची स्थिती

प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. मोडक सागर धरणाची पातळी १६१.०१९ मीटर असून, एकूण पाणीसाठा १११.६८ दशलक्ष घनमीटर आहे. पाणीसाठ्याची टक्केवारी ८६.६२ टक्के इतकी आहे. गेल्या २४ तासांत येथे १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तानसा या धरणातील पाणीसाठा ९९.२०% पर्यंत पोहोचला आहे. सध्याची पातळी १२८.५६५ मीटर असून, उपयुक्त पाणीसाठा १४३.९२ मिलियन क्यूबिक मीटर आहे. मध्य वैतरणा धरणही ९७.२३% भरले आहे. सध्याची पातळी २८४.०६ मीटर असून, १८८.१८ मिलियन क्यूबिक मीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, धरणाचे ५ दरवाजे १० सेमी उघडून ३५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. पावसाची ही संततधार अशीच सुरू राहिल्यास, लवकरच सर्व धरणांमधील पाणीसाठा १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.