पालघर : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चिकू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे चिकू झाडावरील फुल व फळांची गळ झाली असून यामुळे बागायतदाराला त्याची झळ पुढील वर्षी फेब्रुवारी पर्यंत बसण्याची शक्यता आहे.
मे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात झालेल्या वादळी वातावरणासह पावसामुळे चिकू फळझाडांवरील फुल व फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरत असताना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालघर जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले.
डहाणू तालुक्यासह तलासरी तालुक्यातील झाई, बोरगाव, ब्राह्मणगाव, जांबुगाव इत्यादी किनाऱ्यालगतच्या भागात असणाऱ्या चिकू बागायतदारांना त्याचे नुकसान झाले असून फुल व फळगळ झाल्याने तोंडाशी आलेला घास निसर्गाने फिरवला आहे. त्यामुळे दिवाळीपासून सुरू होणाऱ्या चिकूच्या हंगामाला लगाम (ब्रेक) बसला असून या मुसळधार पावसामुळे चिकू फळ उत्पादनावर पुढील पाच-सहा महिने परिणाम होणार आहे असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
मे महिन्यातील पावसाचा परिणाम चार महिने जाणवत असताना चिकू बागायतदारांसाठी दोन बहरांच्या हंगामावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. या पावसामुळे बाधित झालेल्या चिकू बागांमध्ये काळपट पडलेले व सडत असलेल्या चिकूचा खच पडला असून यामुळे आगामी काळात बुरशीजन्य व अन्य रोगांचा प्रसार होण्याची देखील भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यात सुमारे ४००० हेक्टर क्षेत्रावर चिकू लागवड असून सन 2024 – 25 च्या खरीप हंगामात ३८७८ शेतकऱ्यांनी (३५५० हेक्टर) विमा कवच घेतला होता. या योजनेत सुमारे २३.६० कोटी रुपयांचे विम्याच्या अनुरूप नुकसान भरपाई देण्यात आली होती. सन 2024 – २५ च्या रबी हंगामात ३५३२ शेतकऱ्यांनी २०२३ हेक्टर क्षेत्र हे विमा कवचाने संरक्षित करून घेतले होते. यंदाच्या खरीप हंगामात (२०२५- २६) मध्ये ४०२९ बागायतदारांनी ३४६२ क्षेत्रा वरील चिकू पिकाचे विमा काढला असून विमा कालावधी सप्टेंबर अखेरीपर्यंत कार्यरत राहणार आहे.
या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश बागेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी अजूनही शासनाने नैसर्गिक आपत्ती घोषित केलेले नाही. त्यामुळे मुसळधार पावसामुळे झालेल्या चिकू संदर्भात सर्वेक्षण अजूनही हाती घेण्यात आले नाही. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना हवामानाच्या मानकांप्रमाणे सप्टेंबर नंतर लागू झाल्यास विमा अनुरूप नुकसान भरपाई देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. गेल्या तीन-चार वर्षांपासून डहाणू परिसरातील चिकू बागायतदारांना विम्याचा लाभ मिळत असल्याचे दिसून आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
सलगचा पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता व भागांमध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे पालापाचोळा व गळलेल्या चिकू फळांची कुजण्याची क्रिया वाढली आहे. चिकू बागांची एकूण झालेली वाढ, लागवड क्षेत्रात असणारी स्वच्छता, हवा खेळती राहण्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे तसेच हवेतील दमटपणामुळे बुरशीजन्य रोग अनेक बागांमध्ये सुप्त अवस्थेत राहत आहे. दमदार पाऊस व हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर बुरशीजन्य रोगांचा पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून या बुरशीजन्य रोगामुळे चिकूच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. दरवर्षी उद्भवणारी ही समस्या सोडवण्यासाठी संबंधित संशोधन केंद्रांना अपेक्षित यश लाभले नसल्याचे चित्र आहे. मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे होणाऱ्या चिकूच्या नुकसानी सोबत चिकू भागात जणांना बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा फटका बसत आहे.
डहाणू व तलासरी तालुक्यात चिकू बागायत क्षेत्रांवर बुरशीजन्य रोगांचा झालेला प्रादुर्भाव अभ्यासण्यासाठी कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागातील अधिकारी संयुक्त पाहणी करून या संदर्भात अहवाल पुढील काही दिवसात सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. बुरशीजन्य रोगावर असणारी औषध बागायतदाराला सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासन आम्ही केल्याची माहिती त्यांनी दिली.