पालघर : मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस बुधवारी दिवसभर बरसत राहिल्याने जिल्ह्यातील वैतरणा व पिंजाळ नदीने इशारा पातळी गाठली. पावसामुळे मनोर- वाडा तसेच वाडा- भिवंडी रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरीही जव्हार, वाडा, पालघर, विक्रमगड व मोखाडा येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दिवसभर पावसाने वाडा, पालघर व डहाणू तालुक्यात जोर कायम राखल्याने वैतरणा व पिंजाळ नदीने इशारा पातळी गाठली आहे. या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने गावपाडय़ांचा संपर्क तुटला होता. पावसामुळे पडझड झालेल्या झाडांमुळे दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पालघरसह वसई- विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून ३५५२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सायंकाळी सुरू झाल्याने सूर्या नदीच्या पातळीमध्ये झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता आहे. नदी किनारी असणाऱ्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

१२ कर्मचारी वैतरणा नदीत अडकले

मुंबई : बडोदा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीच्या कामात बहाडोलीजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी एका नावेवर आठ तर त्यापासून काही अंतरावर असणाऱ्या एका बोटीमध्ये चार असे १२ कर्मचारी अडकले आहेत. या नावेची व बोटीची नदीपात्रात नांगरणी झाली असली तरीही वैतरणा नदीमधील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने त्यांना धोका कायम आहे. या ठिकाणी एनडीआरएफची तुकडीला दाखल झाली असली तरीसुद्धा नदीतील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर बचाव कार्यासाठी वायुदलाला पाचरण करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.