पालघर: तारापूर औद्योगिक वसाहतीच्या लगत असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या घरगुती घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने हा कचरा काही ग्रामपंचायती औद्योगिक वसाहत परिसरात जाणीवपूर्वक टाकत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने हा कचरा कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली असून वसाहत परिसरात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या १५-२० वर्षांपासून औद्योगिक वसाहत परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये निर्माण होणाऱ्या घरगुती कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या भागात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक अभ्यास झाला नसल्याने नेमका कशा पद्धतीचा व किती क्षमतेचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारावा याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही. या प्रस्तावित कचरा व्यवस्थापन केंद्रासाठी एमआयडीसीकडे जागा उपलब्ध नसल्याने तसेच लगतच्या ग्रामपंचायतीने जागा देण्यास नकार दिल्याने प्रकल्प उभारण्यासाठी जागेची समस्या कायम आहे. पालघर जिल्हा परिषदेने या संदर्भात काही महिन्यांपूर्वी बैठकीचे आयोजन करून यासंदर्भातील प्रलंबित समस्या जाणून घेतल्या होत्या. या प्रसंगी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन या कामी जागेची मागणी करण्याचे निश्चित झाली असली तरी याबाबत विशेष प्रगती झाल्याचे आढळून आले नाही.
एमआयडीसीकडून वेगवेगळय़ा पद्धतीची करवसुली केली जात असून त्याचा ५० टक्के हिस्सा ग्रामपंचायतीला दिला जात आहे. त्यामुळे घरगुती कचरा व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत झटकून टाकण्याचा प्रयत्न करीत असून ग्रामपंचायत हद्दीमधील एकत्रित होणारा कचरा जाणीवपूर्वक तारापूर औद्योगिक वसाहतीमधील वेगवेगळय़ा ठिकाणी टाकण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे.
जागेची अडचण
या संदर्भात एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्यासाठी सामाजिक दायित्व निधीमधून काही उद्योग समूह तयार असले तरीही जागेची उपलब्धता नसल्याने याबाबत मार्ग निघालेला नाही. एमआयडीसीतर्फे घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे अपेक्षित नसून ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक एमआयडीसी क्षेत्रात कचरा टाकला जात असल्याचे आरोप त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कचरा व्यवस्थापन केंद्रासाठी जागा मिळण्यासाठी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत जागेच्या उपलब्धतेबाबत एमआयडीसी व स्थानिक स्वराज्य संस्था एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने बोईसर परिसरात अनेक ठिकाणी आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ
एमआयडीसी क्षेत्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये मृत जनावरे, प्लास्टिक पिशव्या तसेच ओल्या कचऱ्याचा समावेश असून संबंधित ग्रामपंचायत कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबरीने प्लास्टिकबंदी संदर्भात राज्य सरकारचे स्पष्ट आदेश असूनही या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या तसेच त्या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.