कासा:   दापचरी दुग्ध प्रकल्पामध्ये हजारो मोठमोठी झाडे आहेत. या ठिकाणची शेकडो झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून, लाखो रुपयांची वनसंपत्ती चोरीला जात आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून होणारी जंगलतोड थांबवावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

मुंबईमधील तबेले मुंबई बाहेर वसवण्यासाठी व मुंबई शहराला ताज्या व शुद्ध दुधाचा पुरवठा करण्यासाठी १९७३-७४ मध्ये मुंबई पासून १५० किलोमीटर दूर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे सुमारे साडेसहा हजार एकर जमिनीवर दापचरी दुग्ध प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. परंतु योग्य नियोजन व व्यवस्थापन नसल्याने प्रकल्प डबघाईला गेला. प्रकल्पाची साडेसहा हजार एकर जमीन अजूनही प्रकल्पाच्याच ताब्यात आहे. या जमिनीवर असंख्य साग, सुरू, आंबा अशी अनेक शेकडो वर्षांची जुनी झाडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राजरोसपणे या जुन्या झाडांची कत्तल सुरू आहे. गेल्या काही दिवसांत साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे मोठमोठी झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र याकडे दापचरी दुग्ध प्रकल्पातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकल्पातील शेतकरी  आणि रहिवासी करत आहेत.  प्रकल्प अधिकाऱ्यांना  वारंवार लेखी तक्रारी देऊन ही ही झाडांची कत्तल अद्यपही सुरूच आहे. सत्तर ते ऐशी फूट उंचीची झाडे तोडली जात आहेत. झाड तोडण्यापूर्वी खोडाला आग लावून झाड पेटवून दिले जाते, त्यामुळे झाड जमिनीवर पडले की त्या झाडाची चोरी होते. सागवान, सुरू आंबा या झाडांच्या लाकडांचा फर्निचर बनवण्यासाठी त्याचप्रमाणे स्थानिक ठिकाणी असलेल्या वीटभट्टय़ा, बेकरी या ठिकाणीही  लाकडांचा पुरवठा केला जातो.  एवढे सारे घडत असताना दापचरी प्रकल्पाचे अधिकारी केवळ वनविभागाला पत्र देऊन स्वत:ची जबाबदारी झटकत आहेत.  प्रकल्प प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा उपयोग करून सदर सध्या जिवंत असणाऱ्या हजारो झाडांची कत्तल रोखता येऊ शकते , असे स्थानिक युनिटधारक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

आमच्याकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे परिसरातील काही नागरिक या झाडांची कत्तल करत आहेत. याबाबत आम्ही वनविभागाला २१ डिसेंबर रोजी पत्र दिले आहे. तसेच याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. 

– तनुज्या पाटील, प्रकल्प अधिकारी,  दापचरी

आम्ही वारंवार झाडांच्या होणाऱ्या कत्तलीबाबत प्रकल्प अधिकारी यांना कळवले आहे. परंतु अधिकारी वर्ग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.  

-अंजुम शेख, युनिट धारक शेतकरी, दापचरी प्रकल्प