बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कारखान्यात आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्याच्या काही भागाचे नुकसान झाले असून यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आगीची खबर मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या तारापूर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एन- ६० वरील ओयझर केमिकल प्रा.ली. या कंपनीत दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली.
हेही वाचा : पालघर : सकाळी ७.०५ वाजताच्या डहाणू विरार उपनगरीय सेवेचा फेरविचार
काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. आगीची खबर मिळतात तारापूर अग्निशमन दलाच्या दोन बंबानी घटनास्थळी पोचून अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. रासायनिक कारखान्याला आग लागल्याचे समजताच आतमधील कार्यालयीन कर्मचारी आणि कामगार यांना त्वरित सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कारखाना आवारात वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागली असण्याची शक्यता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी यांनी व्यक्त केली. आगीत काही प्रमाणात कंपनीचे नुकसान झाले असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.