बोईसर : डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेला सारणी उर्से ते ऐना या दुर्गम गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत असून पहिल्याच पावसाच्या प्रारंभी रस्ता जागोजागी खचल्याचे दिसून येत असल्याने रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डहाणू तालुक्यातील सारणी (राज्य महामार्ग ३०) ते उर्से-ऐना ( प्रमुख जिल्हा मार्ग १४) हा १५.१ किलोमीटर लांबीचा रस्ता तब्बल २५ ते ३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे.

या रस्त्याच्या कामासाठी जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीची सुमारे १७ कोटी २१ लाख रुपयांची न्यूनतम निविदा स्वीकृत होऊन त्यांना कामाचा ठेका देण्यात आला. डिसेंबर २०२३ जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला कार्यारंभ आदेश देऊन १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र काम सुरू होऊन १८ महिन्यांचा कालावधी लोटून देखील रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण करण्यास कंत्राटदाराला अपयश आले आहे.

कंत्राटदाराने मे २०२४ पर्यंत पहिल्या टप्प्यात सारणी ते उर्से या सात किलोमीटर अंतराचे काम पूर्ण केले. पावसानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्से ते ऐना या आठ किलोमीटर अंतर असलेल्या शिल्लक रस्त्याचे सुरू केलेले काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. १२ महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत असताना २४ महिन्यानंतर देखील कंत्राटदाराने १५.१ किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही.

उर्से, साये, आंबीस्ते या गावांच्या हद्दीत तीन ते चार ठिकाणी रस्त्यावर फक्त खडीकरण केले असून डांबरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.तर डांबरीकरण पूर्ण झालेल्या अनेक ठिकाणी रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. नियमित पाऊस सुरू होण्याच्या आधीच निकावली, उर्से, साये, आंबीस्ते गावांच्या दरम्यान बांधलेल्या मोऱ्यांच्या ठिकाणी भेगा पडून रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. साये ते दाभोण गावादरम्यान डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पृष्ठभागावर पसरण्यात आलेल्या लहान आकाराच्या क्रश सॅंडमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

तब्बल ३० वर्षानंतर मी आला नवीन रस्ता

डहाणू तालुक्यातील सारणी – उर्से – ऐना या १५ किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील सारणी, निकावली, आंबिवली, म्हसाड, उर्से, साये, आंबिस्ते, दाभोण ही आठ गावे आणि त्यांतर्गत येणाऱ्या ४० आदिवासी पाड्यांचा दळणवळणाअभावी विकास खुंटला होता. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे डहाणू आणि कासा येथून सारणी उर्से रस्त्यावरील दुर्गम गावपाड्यांना जोडणारी एसटी सेवा २० वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने दैनंदिन कामे आणि शालेय शिक्षणासाठी येजा करणारे शेकडो नागरिक आणि विद्यार्थी यांना खाजगी वाहनांमधून नाईलाजाने प्रवास करावा लागत होता.

सार्वजनिक वाहतुकीच्या स्वयं उपलब्ध नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. सुमारे २५ ते ३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सारणी उर्से ते ऐना हा रस्ता मंजूर झाल्याने या भागात राहणारे जवळपास दहा हजार नागरिक आनंदीत झाले होते. अरुंद असलेल्या रस्त्याची रुंदी वाढून काम दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण होऊन प्रवास सुखकर होण्याची नागरिकांची अपेक्षा होती, मात्र अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुढील किती वर्षे रस्ता सुस्थितीत राहील याची नागरिकांना शंका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारणी उर्से ते ऐना हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर रस्ता पावसाच्या आधी पूर्ण करण्याबाबत जिजाऊ कन्स्ट्रक्शन या संबंधित कंत्राटदार कंपनीला कळविण्यात आले होते. रस्त्याच्या अपूर्ण आणि निकृष्ट कामाबाबत शाखा अभियंता यांचेमार्फत माहिती घेऊन त्याची तातडीने पूर्तता करण्यात येईल. – श्रद्धा शेळके, कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना पालघर.