पालघर : पालघर जिल्ह्यात ६ ते ८ मे दरम्यान वादळी वाºयांसह झालेल्या पावसामुळे २७०० हेक्टरवरील कृषी लागवडीचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील किमान ५०० वीटभट्टी आणि ६० मिठागर व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला. तसेच डहाणू येथील १० बोटींचे नुकसान झाले असून सुक्या मासळीसह एकंदर जिल्हावासीयांचे किमान ५५ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
पालघर जिल्ह्यात सुमारे ९५० वीटभट्टी व्यावसायिक आहेत. त्यात पालघर तालुक्यातील २७० व्यावसायिकांचा समावेश आहे. किमान ५०० व्यावसायिकांचे प्रत्येकी सरासरी पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाजित आहे. तसेच जिल्ह्यात ६० ते ७० मिठागर व्यावसायिक आहेत. त्यात पालघर तालुक्यातील ३० व्यावसायिक आहेत. ऐन उत्पादनाच्या हंगामात वळवाचा पाऊस झाल्याने मीठ उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. केळवे मीठ उत्पादक सोसायटीच्या ३४० एकरवर वसलेल्या संजीवनी मिठागराचे ६०- ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील सर्व मिठागरांचे किमान १२०० एकरवरील मिठागरांचे नुकसान २० कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता पालघर डहाणू मीठ उत्पादक संघाचे अध्यक्ष जगदीश घरत यांनी वर्तवली.
पडलेल्या पावसात धाकटी डहाणू बंदरात नांगरलेल्या मासेमारी बोटींपैकी एक बोट पूर्णपणे निकामी झाली असून उर्वरित ९-१० बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक बोटीला चार-पाच लाख रुपयांची दुरुस्ती अपेक्षित आहे. मासेमारी हंगामातील अखेरचे २०-२५ दिवस मुकल्याने मच्छीमार व्यावसायिकांचेदेखील नुकसान झाले आहे. धाकटी डहाणूसह जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारपट्टीवर सुकत टाकलेली मासळीदेखील भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. एकंदरीत चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते.
सव्वानऊ कोटी भरपाईची मागणी
जिल्ह्यात अनेक ठिकाणी ६ मेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे भाजीपाला, आंबा, चिकू व इतर फळे, उन्हाळी भात अशा सुमारे २७०० हेक्टरवरील कृषी लागवडीचे नुकसान झाले आहे. भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ९.२६ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
तोटा कसा?
’ काळ्या मातीमध्ये कोळसा, तूस आदींचे मिश्रण आणि साच्याच्या माध्यमातून वीट तयार केल्या जातात. १.२० रुपये प्रति नग दर आकारला जातो. बाजारात ती सहा रुपये प्रति नग दराने विकली जाते. पावसात प्रत्येक वीटभट्टीतील एक ते दोन लाख विटांचा चिखल झाला आहे. त्यामुळे विटांचा दर्जा खालावल्याने आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात मनुष्यबळ, साठवलेली मातीचा अपेक्षित वापर न झाल्याने वीटभट्टीधारकांचे नुकसान झाले.
’ उत्पादनात प्राथमिक टप्प्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान उत्पादित होणारे मीठ तुलनात्मक कमी दर्जाचे असते. मिठागराच्या एकंदर उत्पादनातील निम्मे उत्पादन मे महिन्यात होते. या महिन्यात मीठ उच्च दर्जाचे असते. पावसाचे पाणी मिसळल्याने मिठागरामधील पाण्याचा खारटपणा (डिग्री) कमी झाल्याने मीठ उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच उर्वरित कालावधीत उच्च दर्जाचे मीठ उत्पादन होऊ न शकल्याने उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
‘वीटभट्टीला लघु उद्योगाचा तर मीठ उत्पादनाला शेती व्यवसायाचा दर्जा द्या’
वीटभट्टी व्यवसाय हा आपत्कालीन मदतीच्या प्रवर्गात येत नसल्याने आभाळाच्या छत्रछायेखाली चालणाºया या व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देऊन त्याला विमा कवच मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीट उत्पादक व मजूर संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांनी केली आहे. या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालक व मजूर यांचे नुकसान झाले असून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून त्याला मदत जाहीर करावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. तर मीठ उत्पादनाला शेती व्यवसायाचा दर्जा मिळावा, तसेच मिठागरांना औद्योगिक दराने होणारा वीजपुरवठा शेतीच्या दराने मिळावा, या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून विशेष पॅकेजद्वारे उत्पादकांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी पालघर जिल्ह््यातील मिठागर व्यावसायिकांनी केली आहे.