पालघर : वाढवण बंदराच्या उभारणीच्या कामा करिता दोन मार्गिका असणारा १७.५० किलोमीटर लांबीच्या स्वतंत्र सेवा रस्ता ३५२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. या सेवा रस्त्याच्या स्थानिकांसाठी खुला ठेवण्यात येणार असून यामुळे वाहतूक सुलभ होऊन स्थानिक व्यापार आणि सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी एक प्रेरक घटक ठरण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील वाढवण येथे भारतातील पहिले मेगा पोर्ट व १३ वे मेजर पोर्ट विकसित होत आहे. या बंदराच्या संचालक मंडळाची २९ जुलै रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामास प्रारंभ करण्याची घोषणा करण्यात आली. सर्वसमावेशक विकासासाठी व्हीपीपीएलच्या कटिबद्धतेचा हा आणखी एक टप्पा आहे. या निर्णयामुळे वाढवण बंदर प्रकल्पाबरोबरच परिसरातील स्थानिक समुदायांनाही थेट लाभ होणार आहे.
प्रस्तावित वाढवण बंदरापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) वरोर पर्यंत विकसित होणाऱ्या आठ पदरी एनएच- २४८एस महामार्गासाठी भू-संपादन प्रक्रिया सुरू आहे. हा महामार्ग तवा येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महा मार्ग (एनएच-८) आणि चिंचारी येथे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गांशी जोडला जाणार आहे. हा महामार्ग केवळ मालवाहतुकीसाठीच नव्हे, तर प्रादेशिक विकास आणि दळणवळणासाठी एक प्रमुख मार्ग बनणार आहे.
या व्यतिरिक्त, व्हीपीपीएल बंदराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली वाहतूक सुलभ करण्यासाठी दोन लेनचा स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार करण्यात येत आहे. हा रस्ता स्थानिक नागरिकांनाही खुला असणार असून त्यामुळे परिसरातील सध्याची वाहतूक सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्या व सूचनांचा विचार करून या योजनेत अंडरपास, क्रॉस पैसेज, उड्डाणपूल, रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि सर्व्हिस रोड यांचा समावेश केला जाणार आहे. हा संपूर्ण रस्ता स्थानिक रहिवाशांसाठी टोलमुक्त असेल असे यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गापर्यंत असलेली सुधारित जोडणी मालवाहतुकीला गती देईल, स्थानिक व्यवसायांसाठी नवीन बाजारपेठा खुल्या करतील तसेच साहाय्यक उद्योग व सेवा क्षेत्र आकर्षित करतील. परिणामी, या संपूर्ण परिसरात सकारात्मक विकासाचा अनुक्रम निर्माण होईल.
“जागतिक दर्जाचे पोर्ट उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहेच, पण त्याचबरोबर या प्रकल्पाच्या वाढीचा सकारात्मक परिणाम परिसरातील स्थानिक समुदायांवरही व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे जेएनपीए चे अध्यक्ष व व्हीपीपीएल व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांनी सांगितले.
“हे रस्ते प्रकल्प वाढवण आणि शेजारच्या परिसरातील नागरिकांप्रती आमची कृतज्ञता दर्शवतात. सुधारित संपर्क सुविधांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सुलभ होतील, तसेच नव्या उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील. हा टोलमुक्त व सर्वहवामानात वापरता येणारा ग्रीनफिल्ड दोन लेनचा मार्ग असेल या मार्गामुळे शेतकरी, डायमेकर आणि मासेमारी करणाऱ्या लोकांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल व बाजारपेठेपर्यंत सहज पोहोचता येईल,” – उन्मेष वाघ, जेएनपीए अध्यक्ष व व्हीपीपीएल व्यवस्थापकीय संचालक
व्हीपीपीएल बद्दलः
वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) हे देशाचे १३वे मोठे बंदर असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (MMB) यांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन करण्यात आलेले एक विशेष उददिष्ट असलेले कंपनी रूपातील उपक्रम आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ वसलेले हे बंदर जागतिक स्तरावर आघाडीच्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवण्यास सक्षम आहे. ३० ऑगस्ट २०२४ रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण घडला.
निसर्गपूरकतेला प्राधान्य देत, वाढवण बंदर हे शंभर टक्के हरित तत्त्वावर आधारित असणार आहे, जे पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करत अधिक कार्यक्षमतेने काम करेल. २४ दशलक्ष टीईयू (TEU) माल हाताळण्याची क्षमता असलेले हे बंदर देशाच्या व्यापार कार्यक्षमतेला गती देणार आहे. या माध्यमातून आर्थिक प्रगतीला चालना मिळेल आणि परिसराचा सर्वागीण विकास होईल. वाढवण पोर्ट कौशल्य कार्यक्रमांसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक समुदाय सशक्त करण्यावर वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड विशेष भर देत आहे.