नीरज राऊत
भौगोलिक मानांकन मिळालेल्या चिकू फळाचा स्थानिक पातळीवर प्रचार-प्रसार योग्य पद्धतीने न झाल्याने तसेच या फळाचे सर्वसामान्यांपर्यंत सादरीकरण करण्यास बागायतदार अपयशी ठरल्याने चिकूचे सेवन (गोडवा) पालघर जिल्ह्यात मर्यादित स्वरूपात राहिला आहे. चिकू लागवडीदरम्यान येणाऱ्या अडचणी, फळ पिकवण्यासाठी तंत्रज्ञानावर संशोधन होणे तसेच त्याचे आकर्षक पद्धतीने पॅकेजिंग करून विक्री केल्यास या फळाचा लागवड क्षेत्र वाढ होण्यास उपयुक्त ठरू शकेल.
गोड, सुमधुर आणि रसाळ असलेल्या चिकू फळांमध्ये सर्व प्रकारचे पोषक अन्न घटक मुबलक प्रमाणात असल्याने चिकूचे नियमित सेवन करणारी व्यक्ती नेहमी तरुण, उत्साही व शक्तिवर्धक राहते असा दावा अभ्यासकांनी केला आहे. १९०१ साली घोलवडमध्ये दाखल झालेल्या चिकू या फळाची ६५०० हजार हेक्टरमध्ये लागवड झाली असून प्रत्येक झाडातून वर्षांला १५० ते २०० किलो फळाचे उत्पादन होत असते. १९६५ ते १९७० दरम्यान फळ पोखरणाऱ्या अळी व नंतर २००२ ते २०१५ दरम्यान बी पोखरणाऱ्या अळीमुळे येथील बागायतदारांना डोकेदुखी झाली होती. लागवड झालेल्या चिकू झाडांमधील अंतर कमी असल्याने तसेच चिकू झाडांची नियमित छाटणी होत नसल्याने दमट वातावरणात चिकू भागांवर पावसाळय़ात येणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे शेतकरी त्रस्त राहिले आहेत. जमिनीवर पडलेल्या पाला पाचोळय़ाची सफाई करणे, जुन्या व उंच झालेल्या झाडांची छाटणी करून झाडांची पुनर्जीवन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिकू फळांमध्ये आढळणाऱ्या कीड व्यवस्थापनासाठी ऑरगॅनिक औषधांच्या फवारणीद्वारे सामूहिक उपचार करण्यासाठी शासनाने प्रयत्न गरजेचे आहेत.
सुमारे ५० ग्रॅम वजनाचे असलेले फळाची बागायतदारांकडून सरासरी १५ ते २० रुपये प्रति किलो इतक्या दराने विक्री होत असली तरीही या नाशिवंत फळाच्या वाहतूक व विक्री दरम्यान ३० ते ४० टक्के नुकसान होत असल्याने सर्वसामान्यांना काही पट अधिक किमतीने विक्री करणे व्यापारांना भाग पडत आहे. चिकू फळावर नैसर्गिक असणारी दाणेदार लव फळ धुण्याच्या प्रक्रियेतून काढून, या भागातील चिकू सोनेरी चमकदार बनवण्यासाठी केलेल्या बागायतदारांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. त्याचे गुजरात व राज्यातील इतर भागांत अनुकरण केले जात आहे.
चिकू उत्पादन करणारे बागायतदारांकडून दररोज फार मोठय़ा प्रमाणात फळाचे उत्पादन होत असल्याने त्याची किरकोळ बाजारात विक्री करण्याऐवजी त्याला घाऊक स्वरुपात व्यापाराला किंवा खरेदी-विक्री संघाकडे विक्रीसाठी सुपूर्द केले जात आहे. सर्व सामान्यांपर्यंत चिकू माफक दरात पोहोचावे तसेच स्थानिक पातळीवर या फळाचे महत्त्व वाढवण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न तोकडे पडले आहेत.
बागायतदारांची नवीन पिढी शेती व्यवसायात येण्यास उत्सुक नाही तसेच फळ प्रक्रिया यासाठी असलेल्या सुविधा मर्यादित स्वरूपात असल्याने बाधित होणाऱ्या चिकू फळ लवकरात लवकर विक्री करण्याची आव्हान बागायतदारांना समोर नेहमी असते. त्यामुळे मिळेल त्या दराने त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो. गुजरात राज्यात चिकू बागायतदारांच्या सहकारी संस्था सक्रिय असल्याचे दिसून येत असताना डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांच्या सहकारी संस्था यांचा मर्यादित प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे चिकूची विक्री व्यापाऱ्यांच्या धोरणांवर अवलंबून राहावे असल्याने किरकोळ बाजारामध्ये इतर फळांच्या तुलनेमध्ये चिकूचे दर अधिक राहतात.
चिकू उत्पादन क्षेत्रामध्ये विद्यापीठाचे संशोधन केंद्र असावे ही बागायतदार महासंघाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी दुर्लक्षित राहिली आहे. चिकू पिकवण्यासाठी पूर्वी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडवर शासनाने बंदी आल्यानंतर पावसाळय़ात व हिवाळय़ात हे फळ पिकवण्याचे आव्हान बागातदार समोर असते. इथलीन वायुद्वारे चिकू पिकवण्यासाठी प्रयोग व पायलट प्रोजेक्ट कार्यरत नसल्याने या माध्यमातून चिकू फळ रायपिनग चेंबरमध्ये समान पद्धतीने पिकविण्यास अपेक्षित यश आले नाही. शिवाय इथलीनद्वारे पिकविण्याच्या पद्धतीमुळे फळ काही प्रमाणात सैल (ढिले) पडत असल्याने त्याच्या विक्रीवर परिणाम होत आहे. सध्या काही व्यापारी पिकविण्यासाठी चायना पुडीह्ण नामक पदार्थाचा वापर करत असून या पद्धतीचा अवलंब केल्यास चिकूची नैसर्गिक चव बदलून फळाचा रंग काही प्रमाणात काळा होतो. फळाला तेज नसल्याने ग्राहकांकडून त्याची पसंदी होत नाही. एकंदरीतच किवी, स्ट्रॉबेरी व इतर फळे यांसारख्या आकर्षक पॅकिंग पद्धतीचा अवलंब केल्यास, फळाची इथलीनद्वारे पिकवण्याची पद्धत विकसित केल्यास तसेच फळाचे सेवन आयुष्य (शेल्फ लाइफ) वाढवण्यासाठी प्रयत्न झाल्यास चिकूची स्थानीय बाजारपेठेमध्ये मागणी वाढेल.
सध्या चिकू फळाला थंडीच्या प्रदेशात विशेष मागणी असून किसान रेल्वेसारखी वाहतूक सुविधा प्राप्त झाल्याने डहाणू- घोलवडचे फळ दिल्ली मार्केटमध्ये अवघ्या २० ते २२ तासांमध्ये कमी खर्चात पोहोचत आहे. चांगल्या पद्धतीने धुतला गेलेला चमकदार व मोठा आकाराचे चिकू मुंबई, पुणे सातारा-सांगली या भागांत विक्रीसाठी जात आहे. जिल्ह्यामध्ये नोकरी-धंद्याच्या निमित्ताने इतर राज्यातील अनेक रहिवासी स्थायिक झाल्याने त्यांच्या पसंतीने चिकूची स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील मागणी वाढत चालली आहे. तरीदेखील या आरोग्यदायी फळांमध्ये असणाऱ्या वैद्यकीय उपयुक्त गुणधर्माचा योग्य प्रकारे प्रचार व प्रसार केल्यास तसेच या फळाचे सादरीकरण आकर्षक पद्धतीने केल्यास झपाटय़ाने लोकसंख्या वाढणाऱ्या पालघर जिल्ह्यात या फळाची मागणी वाढून बागायतदारांना त्याचा लाभ होऊ शकेल.
