पालघर : देशाची सागरी सुरक्षा तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी किनारपट्टीची लांबी नेमकी किती आहे, याला महत्त्व आहे. अलीकडेच भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे नवी आकडेवारी समोर आली असून देशाच्या किनारपट्टीची लांबी ७५१६.६० किलोमीटरवरून ११,०९८.८१ किलोमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबीही ७२० किलोमीटरवरून ८७७.९७ किलोमीटर झाली आहे.

केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेने २९ एप्रिल रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर किनारपट्टीची लांबी १९७० पासून ७५१६.६० किलोमीटर दर्शवण्यात येत होती. किनारपट्टी सर्वेक्षण आणि विकास सल्लागार समितीच्या मे २०१० आणि जुलै २०१९ मधील बैठकांमध्ये यावर चर्चा झाली. राष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने (एनएचओ) वाढीव लांबी स्वीकारल्यानंतर गृहमंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन विभागाने सर्वेक्षण विभागाला अधिसूचना जारी करण्याची विनंती केली होती. १० ऑगस्ट २०२३ व ४ जानेवारी २०२४ रोजी राज्ये, केंद्रशासित प्रदेश तसेच विविध मंत्रालयांनी ही आकडेवारी स्वीकारली. बेटांची संख्या १२९८ (ऑफशोअर बेटे-१०५९ व बेटे २३९ बेटे) इतकी अंतिम करण्यात आली आहे. १९७०च्या दशकात स्केल मर्यादा आणि पारंपरिक मॅन्युअल मापन पद्धतींमुळे वगळलेल्या सत्यापित किनारपट्टीच्या एकूण लांबीमध्ये ऑफशोअर बेटांची लांबी जोडली गेली आहे. शिवाय, किनारपट्टीच्या लांबीची गणना करण्यासाठी वैयक्तिक ऑफशोअर बेटांची परिधीय किनारपट्टी वापरली गेली आहे.

किनारपट्टीच्या लांबीवाढीबाबत केंद्रीय बंदर मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे करण्यात येईल. किनारा लांबी संदर्भातील संभाव्य कारणांचा परिपत्रकात उल्लेख आहे. – डॉ. बाबाजी मस्करे, उप जलविज्ञानशास्त्रज्ञ, महाराष्ट्र सागरी मंडळ

कारणे काय?

● प्रमाण (स्केल) व गणना पद्धतीमध्ये झालेला फरक लांबी वाढण्यास कारणीभूत

● १९७० च्या दशकातील मोजणीचे प्रमाण एकास ४५ लाख किंवा त्यापेक्षा कमी

● पुनर्पडताळणीमध्ये एकास २ लाख ५० हजार प्रमाणाचा वापर, प्रमाण अधिक असल्यास लांबीवर परिणाम शक्य

● १९७० च्या तुलनेत गणना पद्धतीसाठी मॉडेम, जीआयएस सॉफ्टवेअरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर

राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे किनारपट्टीची लांबी (किलोमीटर मध्ये)

राज्य/ केंद्र शासित प्रदेश : लांबी (किमी)

महाराष्ट्र : ८७७.९७

गुजरात : २३४०.६२

गोवा :१९३.९५

कर्नाटक : ३४३.३

केरळ : ६००.१५

तमिळनाडू : १०६८.६९

आंध्रप्रदेश : १०५३.०७

ओडिशा : ५७४.७१

पश्चिम बंगाल : ७२१.०२

दमण- दिव : ५४.३८

पॉन्डीचेरी : ४२.६५

लक्ष्वदीप बेट : १४४.८

अंदमान निकोबार बेट : ३०८३.५

एकूण किनारपट्टी लांबी : ११०९८.८१