पालघर : बांबूचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व जनतेसमोर अधोरेखित करणे, तसेच बांबू आधारित उद्योग, हस्तकला आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देणे या उद्देशाने जव्हार येथे नुकताच तीन दिवसीय बांबू महोत्सव संपन्न झाला होता. महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबाला अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण समुदायाच्या अर्थव्यवस्थेला बांबू या नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून बळकटी देण्यासाठी केशवसृष्टी संस्थेच्या वतीने जव्हार येथील केशवसृष्टी ऑक्सिजन पार्क येथे ८, ९ व १० नोव्हेंबर तीन दिवसीय बांबू महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जलद वाढणारे, पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारे बांबू हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी कसे वरदान ठरू शकते, हा संदेश या उत्सवाद्वारे यशस्वीरित्या पोहोचवण्यात आला.

तीन दिवसीय बांबू महोत्सवात ग्रामीण व शहरी भागातून २००० हून अधिक नागरिक, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या महोत्सवात आदिवासी कला प्रदर्शनच्या माध्यमातून तारपा, ढोल, टिपरी आणि तूर यांसारख्या लुप्त होत चाललेल्या पारंपरिक कला पंधरा कला-गटांनी सादर केल्या. यासह वारली पेंटिंग, रांगोळी, रानभाज्यांच्या पाककला आणि भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

बांबू लागवडीतून उपलब्ध होणाऱ्या बांबूद्वारे ग्रामीण भागातील नागरिक रोजगारासाठी बांबूच्या विविध हस्तकला, आधुनिक बांबू वस्तू, घरगुती आणि सजावटीच्या वस्तू बनवू शकतात याकरिता प्रदर्शन व प्रात्यक्षिक भरवण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून सहभागी आदिवासी महिलांना जवळपास ३०,००० चे उत्पन्न प्राप्त झाले. ग्रामीण भागात तरुण वर्गामध्ये युट्युब आणि रील क्रिएटर्ससाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धा व उपक्रमांमध्ये एकूण ३३७ स्पर्धक सहभागी झाले, ज्यामुळे तरुण आणि महिलांमध्ये स्वरोजगार आणि उद्योजकतेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

या महोत्सवाला विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये, प्रकल्प अधिकारी अपूर्वा बसूर, तसेच उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केशवसृष्टीचे सहकार्यवाह संतोष गायकवाड, आशा खोडे, गौरव श्रीवास्तव, मोहित गाडीया, केंद्र पालक प्रमिला कोकड, श्री. पिलाना, केंद्रप्रमुख कैलास कुरकुटे, विस्तारक राहुल खोटरा आणि कृषी प्रमुख उमेश राऊळ यांच्यासह संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी काम केले.

केशवसृष्टीचा ग्रामविकास मॉडेल

केशवसृष्टी संस्थेतर्फे वाडा, विक्रमगड, जव्हार, कासा व खोडाळा या भागातील १७० गावांमध्‍ये गेल्या काही वर्षांपासून ग्रामविकासाचे भरीव कार्य सुरू आहे. कृषीजल, शिक्षण, आरोग्य आणि गृह उद्योग-स्वयंरोजगार या माध्यमातून डोंगरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना बांबू उद्योगाच्या माध्यमातून स्थायी रोजगार उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. केशवसृष्टीचे बिमलजी केडिया यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यात मोठे योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला.

बांबू महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून देखील पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात साडेदहा लक्ष बांबू लागवड करण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीत पालघर जिल्हा राज्यात प्रथम असून, पुढील तीन वर्षांत या बांबू लागवडीचा चांगला परिणाम रोजगार आणि आर्थिक उत्पन्नावर दिसून येईल. – विजया जाधव, रोहयो, उपजिल्हाधिकारी.