पालघर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत पालघर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेली १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम सर्व जिल्ह्यांत व राज्यात ७ जानेवारी २०२५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात आली होती. शासकिय कार्यालयामध्ये कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणणे, सेवांचा कार्याक्षम वितरण, डिजिटल प्रक्रिया वाढविणे आणि जनतेच्या तक्रारीवर वेगाने कार्यवाही करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता .
या विशेष मोहिमेत कार्यालयीन प्रक्रियेतील कार्यालयातील संकेतस्थळ अद्ययावत करणे, सुकर जीवनमान, स्वच्छता अभियान राबविणे, विविध योजनेंतर्गत तक्रार निवारण करणे, कार्यालयीन सोयी सुविधा उपलब्ध करणे, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देणे, कार्यालयीन ई-ऑफिस प्रणाली अद्ययावत करणे, आर्थिक व ओदयोगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, अधिकारी, शेतक-यांना दिल्या जाणा-या सेवा, कर्मचारी प्रशिक्षण व सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान (AI) वापर करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, इत्यादी विषयांच्या अनुषंगाने कार्यालयीन सुविधा राबविण्यात आलेल्या आहेत.
१०० दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत वरील सेवामध्ये अति उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्हाने राज्यात कृषि विभागातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. या विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पालघर यांनी शेतक-यांना त्यांच्या शेतावर उत्कृष्ट प्रतीची कलमे / रोपे फळबाग लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. तसेच नाविन्यपूर्ण बाबी अंतर्गत शेतक-यांच्या शेतावर जलताराची कामे करण्यात आलीत, त्याचप्रमाणे शेतक-यांना, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड येथे मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच यू एन डी पी UNDP प्रकल्पांतर्गत शेतकर्यांच्या क्षारपड जमिनीवर “कोकण खारा” या क्षार प्रतिकारक भाताच्या वाणांचे प्रात्याक्षिके राबविण्यात आले.
अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषि विभागा तर्फे आवाहन
शासनाच्या विविध योजनांचा लाभ शहाजगत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करण्यासाठी कृषि विभागा तर्फे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविता यावा याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. अॅग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे.
कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रीस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषी-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल. आज अखेर पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या १,५६,२९२ खातेदारांपैकी १,१३,५०४ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणी केली आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला एक शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) मिळणार असून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिके नुकसानीची मदत मिळणेसाठी, विविध शासकीय योजनांचा लाभ आणि पीएम किसानचा पुढील हप्ता जमा होणेसाठी सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नंबर असणे बंधनकारक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ७/१२, ८-अ खाते उतारा, बँक खात्याचा तपशील तसेच आधार संलग्न मोबाईल क्रमांक घेऊन ३१ मे पूर्वी आपला शेतकरी ओळख क्रमांक जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी एस सी सेंटर येथे जाऊन तयार करून घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी विविध घटकांचा लाभ घ्यावा
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) सन २०२५-२६ अंतर्गत लागवड साहित्याची निर्मिती (लहान रोपवाटिका,मोठी रोपवाटिका, उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका), क्षेत्र विस्तार (पुष्पोत्पादन, फळपिके, मसाला पिके, सुगंधी व औषधी वनस्पती, कंपोस्ट मेकिंग युनिट, मशरूम उत्पादन प्रकल्प, लहान मशरूम उत्पादन प्रकल्प), जुन्या बागांचे पुनरुज्जीवन (आंबा, चिकू), सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती (हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, पक्षीरोधक जाळी, गारपीट रोधक जाळी, हायड्रोपोनिक्सव अॅरोपोनिक्स, फळांसाठी आवरण, तण आच्छादन (Weed mat), फलो यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर २० अश्वशक्ती पर्यंत/पॉवर टिलर ८ HP वरील व खालील/जमीन सुधारणा/मशागत उपकरणे/पीक संरक्षण उपकरणे), काढणीपश्चात व्यवस्थापन (फार्मगेट पॅक हाऊस/प्राथमिक प्रक्रिया केंद्र/पिकवणी कक्ष/शीतखोली/शीतगृह/कांदाचाळ / रेफर व्हॅन/रापनिंग चेंबर) इत्यादी घटकांचा ४०-५० टक्के अनुदानित तत्वावर लाभ घेण्याकरीता इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर अर्ज करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालघर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
या संदर्भात अधिक महितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालय यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून ऑनलईन अर्ज करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहेत.
शेतकऱ्याचा फोटो, ७/१२ चा उतारा, ८ अ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक अनु जमाती व अनु जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे प्रमाणपत्र