बोईसर : बोईसरमध्ये बुधवारी भरदिवसा केलेली तरुणाची हत्या आणि त्यानंतर तरुणाने केलेली आत्महत्येची घटना ही प्रेमभंगातून घडल्याची स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात प्रेयसीने अचानक नकार दिल्याने प्रियकराने तिचा जीव घेऊन स्वत:ही आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.
बोईसरच्या टीमा रुग्णालयाच्या समोर बुधवारी दुपारी कृष्णा यादव या तरुणाने स्वत:कडील देशी कट्टय़ाने आपली पूर्वाश्रमीची प्रेयसी स्नेहा महतो या तरुणीच्या डोक्यात गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर त्याने स्वत:च्या डोक्यातदेखील गोळी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कट्टा लॉक झाल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर धावतपळत त्याने खैरापाडा उड्डाणपूल सर्कलजवळ विराज कंपनीच्या ट्रकसमोर जीव द्यायचा प्रयत्न केला, मात्र चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने तिथे ही तो सुदैवाने वाचला. पुढे धावत जात त्याने डी डेकॉर कंपनीच्या समोर केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलाच्या ट्रकखाली उडी मारली. यात ट्रकचा मागच्या चाकाखाली सापडून तो गंभीर जखमी झाला होता. तातडीने जवळच्या टीमा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
कृष्णा यादवने आपल्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने गेल्या दोन महिन्यांपासून दोघांत भांडण सुरू होते.
कृष्णा यादव याने त्या दिवशी स्नेहा महतोला जेएसडब्लू मियावाकी पार्कजवळ भेटायला बोलावले होते. त्या ठिकाणी फोटो काढत असताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला. तरुणी निघून जाऊ लागल्यावर तिच्या मागोमाग आलेल्या कृष्णा यादवने टीमा रुग्णालयाच्या समोरच स्वत:कडील देशी कट्टय़ाने मागून तरुणीच्या डोक्यात गोळी झाडली. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तरुणाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीय न आल्याने मृतदेह वसई येथील शवागरात ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस या गोळीबार घटनेचा तपास करीत असून माथेफिरू कृष्णा यादवकडे देशी कट्टा जिवंत काडतुसे नेमकी कुठून आली याचा बोईसर पोलीस शोध घेत आहेत.
तरुणीचे वडील आणि तरुण एकाच कंपनीत
तारापूर औद्योगिओ वसाहतीमधील पॅरामाऊंट या कंपनीत काम करणारा कृष्णा यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील जोंनपुर जिल्ह्यातील असून तो बोईसरजवळील कोलवडे या गावात आपल्या इतर कामगार सहकाऱ्यांसोबत भाडय़ाच्या खोलीत राहात होता. स्नेहा महतो ही तरुणी मूळची बिहारच्या छप्रा जिल्ह्यातील असून ती आपल्या आई-वडिलांसह सरावली येथे राहात होती. तरुणीचे वडील दिनेशकुमार महतो हे ज्या कंपनीत काम करत आहेत त्याच कंपनीत कृष्णा यादव हा काम करत होता.