लोकसत्ता वार्ताहर

वाडा : विक्रमगड तालुक्यात चोरटी जंगल तोड करणाऱ्या जंगल माफियांचा मोठा सुळसुळाट झाला असुन रात्रीच्या अंधाराचा व एकांताचा फायदा घेवुन सागवान व खैर जातीच्या झाडांची चोऱ्या होत आहेत. खाजगी जागेतील झाडांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या मालकांची असल्याने संबंधित वन विभाग मात्र चोरी रोखण्यात हतबल होताना दिसुन येत आहे.

अशीच एक घटना- मौजे दादडे येथील जमीन मालक चंद्रिका महेशभाई पटेल यांच्या मालकीच्या नावे असलेल्या जमिनीतून (गुरुवार, १७ एप्रिल) रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी अंदाजीत दोन लाखांहुन अधिक रक्कमेची २१ खैरांचे झाडांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

विक्रमगड येथील दादडे नंबर २, चंद्रिका पटेल यांच्या मालकीची व कब्जे व वहिवाटीत असलेली गट नंबर २७०,५०३ व ५०९ या जमिनीत खैर जातीची मोठी झाडे व इतर झाडे आहेत. त्यातील २१ खैर जातीची झाडे (गुरुवार १७ एप्रिलला) रात्रीचा अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबतची माहिती जमीन मालक चंद्रिका महेशभाई पटेल व त्यांचे नातेवाईकांना दुसऱ्या दिवशी आजुबाजुच्या असलेल्या जमीन खातेदारांकडून मिळाली. त्यानुसार नातेवाईक दक्षा अशोक पटेल यांनी समक्ष जागेवर जावून शहानिशा केली असता त्यांना २१ खैर जातीची झाडे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत दक्षा पटेल यांनी विक्रमगड वन अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

चोरट्यांकडून खैर जातीच्या झाडांची तस्करी झाल्याने जमीन मालक शेतक-यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारची चोरी अनेक भागात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने याकडे वन विभाग व पोलिस विभाग यांनी जागृत राहून गस्त वाढविणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.

खैरांच्या झाडाला मोठी मागणी व दर

दरम्यान चोरीची झाडे, खैर तस्कर हे आधुनिक कटर मशीन व लिप्ट मशीन अशा अवजारांचा वापर करुन करतात. खैर जातीच्या झाडापासुन खाण्याचे सुगंधित कलर व पानात खाण्यासाठीचा काथा तसेच गुटख्यात मिक्स होणारी पावडर बनत असल्याने खैराच्या झाडाला मोठी मागणी असुन प्रति टन ३५ ते ४० हजार रुपये दर मिळत आहे.

आम्हाला जशी माहिती मिळाली त्यानुसार वन विभागाचे कर्मचारी संबधित जागेवर पाठविले होते. मात्र त्यांना कुठलाही मुद्देमाल मिळून आला नाही. त्याबाबतचा पंचनामा केला असुन चौकशी सुरू आहे. योग्य ती पुढील कारवाई केली जाईल. -भगवान सानप, वनपरिक्षेत्र अधिकारी, विक्रमगड

संबंधित वन विभाग व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचेकडील परिपक्व खैर वृक्ष तोडण्याची परवानगीची प्रकरणे प्रलंबित राहात असल्याने खैर तस्करांचा सुळसुळाट वाढला आहे. वनविभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. -योगेश शंकर पाटील, मनसे, विक्रमगड तालुका अध्यक्ष